वरुण सरदेसाई आणि झिशान सिद्दिकी एकाच मंचावर, 'मातोश्री'च्या अंगणात संभाव्य उमेदवारांची उपस्थिती चर्चेत
शिवसेना ठाकरे गटावर आरोप करणारे वांद्रे पूर्वचे स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी थेट शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांसमोर या कार्यक्रमात पाहायला मिळाले.
Vidhansabha Politics: मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय झाला असं म्हणणरे काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दिकी थेट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत एकाच मंचावर दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थित लावली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर वांद्रे पूर्व मतदारसंघातून दोघेही संभाव्य उमेदवार आहेत.
आपल्याला मतदारसंघात कामात अडथळे आणण्याचा आणि काम न करू देत असल्याचा शिवसेना ठाकरे गटावर आरोप करणारे वांद्रे पूर्वचे स्थानिक आमदार झिशान सिद्दिकी थेट शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांसमोर या कार्यक्रमात पाहायला मिळाले. याच कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब देखील उपस्थित होते.
दोन संभाव्य उमेदवार एकाच मंचावर
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता असणारे आणि तशी तयारी करणारे दोन संभाव्य उमेदवार एकाच कार्यक्रमात एकाच मंचावर या निमित्ताने पाहायला मिळाले. वांद्रे पूर्वमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आमदार झिशान सिद्दीकी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थित लावली. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात संभाव्य उमेदवारांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
उबाठामुळे विकासकामं करता आली नव्हती..सिद्दकी
वरुण सरदेसाई आणि काँग्रेस नेत्यांमधील भेटीगाठींबद्दल बोलताना काँग्रेसचे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी यांनी संताप व्यक्त केला होता. झिशान सिद्दकीने उबाठावर तोफ डागली होती. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या हायकमांडबाबत नाराजी व्यक्त केली होती. उबाठाने माझा फंड अडवून धरला म्हणून मी विकासकामे करू शकलो नाही. माझ्यावर अन्याय होत होता पण हायकमांड मला गप्प राहायला सांगायचे, असा संताप सिद्दीकी यांनी व्यक्त केला होता.
वांद्रे पूर्व मतदारसंघावर वाद
आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीमार्फत लढणार आहे. मात्र जागा वाटपावरून मविआमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व विधानसभा ठाकरे गटाला मिळाली पाहिजे, असा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. यावर काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराज आहेत. वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसचा एक विद्यमान आमदार असला तरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते अशी चर्चा सुरू झाली होती. जर वांद्रे पूर्वची ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा पराभव असेल. शिवसेना ठाकरे गट म्हणेल आम्हीही तेच करणार, तर तसं कसं चालेल? माझ्याविरुद्ध अनेक वर्षांपासून षडयंत्र रचलं जात आहे. काँग्रेसचे काही नेतेही मला बाजूला करण्यात धन्यता मानत आहेत, असं सिद्दीकी म्हणाले होते.