Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांनी सर्व पक्षांकडून मागवली घटनेची प्रत; शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर विधीमंडळाचा सावध पवित्रा
Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली असल्याची माहिती आहे. मागील काळातील घटना पाहता विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून ही मागणी करण्यात आली आहे.
नागपूर: राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदारांनी भाजपसोबत पुन्हा राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाची एंट्री झाली, त्यानंतर काही महिन्यांमध्ये अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदार खासदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाले या तीन पक्षांती महायुती झाली. राज्यात सत्तातंर झालं आणि परिस्थिती बदलली. त्यानंतर आता झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीने मोठं यश मिळवलं आणि राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ विस्तार, विधानसभा अध्यक्ष आणि इतर पदांची देखील नेमणूक झाली. कालपासून हिवाळी अधिवेशन देखील सुरू झालं आहे, अशातच आता विधानसभा अध्यक्षांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली असल्याची माहिती आहे. मागील काळातील घटना पाहता विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून ही मागणी करण्यात आली आहे. पक्षाची घटना किती आवश्यक आहे ते मागील घटनांमधून स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर विधीमंडळाचा सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी घडामोडींना वेग
मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर आता विरोधी पक्षनेते पदासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा आज विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करून नाव देणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारांसोबत होणाऱ्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेता ठरवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधारी, विधानसभा विरोधी पक्षनेता संदर्भात सकारात्मक असताना शिवसेना ठाकरे गटाने ही संधी सोडू नये, असं ठाकरेंच्या आमदारांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाचं नाव समोर येणार? त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडे आज अर्ज केला जाणार का? याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करावा लागणार
विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. अर्ज करण्याऐवजी विरोधी पक्ष आधी विधानसभा अध्यक्ष हे पद विरोधकांना देणार आहेत की नाहीत हे स्पष्ट करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, राज्यघटनेनुसार विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाला आपला नेता निवडून त्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देण्याची विनंती करावी लागणार आहे. त्यानंतरच अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी आता घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज बैठक बोलावली आहे, यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज देण्याबाबतची चर्चा आणि नाव ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.