Maharashtra Politics: प्रजासत्ताकदिनानंतर देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार, 'या' तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलणार?
पालकमंत्रीपदासाठी असणाऱ्या चढाओढीत अनेक मंत्र्यांना वगळण्यात आल्याने महायुतीत नाराजी असल्याची चर्चा आहे.
Maharashtra: राज्यात पालकमंत्रीपदावरून राजकारणाला वेग आला आहे. राज्यातील पालकमंत्रीपदाची (Gurdian Minister List) यादी जाहीर झाली असली तरी आजच्या प्रजासत्ताक दिनानंतर राज्यातील महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. पालकमंत्रीपद वाटपावरून महायुतीत मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. रायगडचे पालकमंत्री आदीती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. तसेच पालकमंत्री पदावरून महायुतीत शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)
देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (19 जानेवारी) जाहीर केली आहे. या यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन-दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत. दरम्यान, पालकमंत्रीपदासाठी असणाऱ्या चढाओढीत अनेक मंत्र्यांना वगळण्यात आल्याने महायुतीत नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस प्रजासत्ताकदिनानंतर मोठा निर्णय घेणार असून रायगड, नाशिक आणि वाशिमसाठी पालकमंत्री बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पालकमंत्रीपदावरून महायुतीत नाराजी वाढली
दादा भुसे, धनंजय मुंडे आणि भरत गोगावले या तीन कॅबिनेट मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नाही, यामुळेही महायुतीतील वाद वाढले असल्याचं बोललं जात आहे.दरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांवर तोडगा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर वाशिमच्या पालकमंत्रीपदातही बदल होण्याची चिन्हं आहेत. वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना हटवून त्यांच्या जागी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
वाशिमसाठी महायुती बंजारा कार्ड खेळणार?
वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेले पोहरादेवी हे तीर्थस्थळ आहे. या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या इंद्रनील नाईक यांना पालकमंत्रीपद देऊन महायुती सरकार ‘बंजारा कार्ड’ खेळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. हसन मुश्रीफ यांना वाशिमच्या पालकमंत्रीपदावरून हटवले गेल्यास त्यांची वर्णी कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी लागेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पद वाटपावरून वाढलेले मतभेद आणि होणाऱ्या बदलांमुळे राजकीय समीकरणं कशी बदलेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Washim)
हेही वाचा: