Maharashtra CM : भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नावाची चर्चा; खुद्द शिंदे गटाच्या नेत्याने सुचवलं नाव
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या यादीत आता आणखी एका नावाची चर्चा पुढे आली आहे.
Maharashtra Politics : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांविषयी (Radhakrishna Vikhe Patil) अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असं सत्तारांना विचारण्यात आलं. तर यावर उत्तर देताना, आपला मित्र मोठा व्हावा असं कुणाला वाटत नाही, विखे पाटील यांनी मुख्यमंत्रिपदापेक्षाही मोठ व्हावं, असं सत्तार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. तर भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या यादीत आता आणखी एका नावाची चर्चा पुढे आली आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असं सत्तारांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "हनुमानासारखा जसा भक्त असतो, तसं माझी छाती फाडून बघितली तर त्यात विखे पाटील दिसतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून, त्यांनी विखे पाटील यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे. पण कुणाला वाटणार नाही की, आपला मित्र काहीतरी व्हावा. मी तर म्हणतो त्याच्यापुढे त्यांनी जावं. पण विखे पाटील यांची अडचण होईल असे प्रश्न विचारु नका, असं सत्तार म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नावाची चर्चा...
भावी मुख्यमंत्रिपदावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान जयंत पाटील यांचे देखील भावी मुख्यमंत्री होर्डिंग लागत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य भाजप नेते करत आहे. अशातच अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली आहे. विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सत्तार यांनी बोलावून दाखवली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाची चर्चा केंद्र स्थानी आहे.
सत्तारांनी विखेंची अडचण वाढवली?
भाजपकडून नेहमीच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच पसंती देण्यात आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील भाजप नेत्यांनी फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हटले. तर शिंदेंना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. एवढंच नाही तर मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने पंकजा मुंडेंना पक्षातून बाजूला केलं जात असल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यामुळे आता सत्तार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विखेंची देखील अडचण तर होणार नाही? अशी देखील चर्चा पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ ! पाहा काय म्हणाले अब्दुल सत्तार