Raju Shetti: 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा', बीआरएसच्या ऑफरवर राजू शेट्टी आज घेणार निर्णय?; पैठणमध्ये बैठक
Aurangabad : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर आज पैठणमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana Meeting: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) झालेल्या सभेनंतर त्यांच्याकडून महाराष्ट्रात पक्ष विस्तारसाठी प्रयत्न केले जात आहे. याच सभेत त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या भाषणात केंद्रबिंदू ठेवले होते. दरम्यान महाराष्ट्रात विस्तार वाढवण्यासाठी आता चंद्रशेखर राव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. एवढचं नाही तर तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, अशी ऑफर दिली आहे. दरम्यान चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर आज (13 फेब्रुवारी) पैठणमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या महिन्यात राव आणि शेट्टी यांच्यात हैदराबादमध्ये बैठक झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली होती. यावेळी 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा', अशी ऑफर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेट्टी यांना दिली होती. मात्र, शेट्टींनी ही ऑफर स्वीकारलेली नव्हती. पण, आज पैठणमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक आज सकाळी 11 वाजता पैठणला होणार आहे. यात या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी बीआरएसच्या ऑफरचे फायदे, तोटे यावरही चर्चा होऊ शकते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान याच बैठकीत कापूस, सोयाबीन पिकांसह पक्षाचा विस्तार, जिल्हा परिषद निवडणुकांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ज्यात आगामी पक्षाची वाटचाल, ध्येयधोरणे आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे.
आम्हाला चळवळीत राहून काम करायचं आहे...
दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ऑफरबाबत बोलताना शेट्टी म्हणाले आहे की, "बीआरएसकडून आम्हाला ऑफर आली असून, आम्ही ती नाकारली आहे." जर पक्ष बदलायचा असेल तर राज्यात इतरही पक्ष आहेत, त्यांची ऑफर स्वीकारली असती. पण आम्हाला चळवळीतच राहून काम करायचे असल्याचे मी चंद्रशेखर राव यांना सांगितले असल्याचं शेट्टी म्हणाले आहे.
युती होऊ शकते?
दरम्यान राजू शेट्टी यांनी आम्हाला चळवळीतच राहून काम करायचं असल्याचं स्पष्ट करत, इतर पक्षात जाणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. मात्र यावर पर्याय म्हणून, शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये युती होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या पैठणमध्ये होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत यावर काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: