Maharashtra Live Blog Updates: जिथे जिथे शक्य, त्या ठिकाणी महायुती करायची; देवेंद्र फडणवीसांची भूमिका
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: आगामी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्विकारले जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
नागपूर-उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग; 45 प्रवासी थोडक्यात बचावले
नागपूर : VIT कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान उमरेड-नागपूर रोडवर आज दुपारी एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याने मोठा अपघात टळला. बसमध्ये एकूण 45 प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे समजते.
घटना दुपारी सुमारे २:३० वाजता घडली. VIT कॉलेजकडून उकळवाही हेटीकडे जाणाऱ्या या ट्रॅव्हल्समध्ये अचानक धूर दिसू लागला. चालकाने तातडीने बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढले. काही क्षणांतच बसने पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झाला.
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, शॉर्ट सर्किटची कारणे तपासली जात आहेत. प्रवाशांमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची अधिक माहिती मिळण्यासाठी कुही पोलिसांचा तपास सुरू आहे.
भंडाऱ्यात महायुती नाही; सर्व पक्षांची स्वबळाची घोषणा
भंडारा : नगराध्यक्षपदाची शिवसेनेची उमेदवारी शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी डॉ अश्विनी भोंडेकर यांना घोषित झाली. यापूर्वी काँग्रेसच्या जयश्री बोरकर, भाजपच्या मधुरा मदनकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा साखरकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. त्यामुळं भंडाऱ्यातील चार नगरपरिषदेत महायुती एकत्र लढणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. तर, काँग्रेसही स्वबळावर लढत असल्यानं आघाडीतही बिघाडी झाल्याचं दिसून येतं आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार उद्या शेवटच्या दिवशी त्यांच्या समर्थकांच्या रॅलीसह उमेदवारी अर्ज सादर करून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.























