'शिरसाट पत्ते खेळतो, भुमरे दारु विकतो अन् सत्तार घर भरतोय'; खैरेंचा शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल
Chandrakant Khaire : शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात खैरे बोलत होते.
Chhatrapati Sambhaji Nagar News : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. दरम्यान ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) शिंदे गटांच्या आमदारांवर हल्लाबोल केला आहे. तर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) पत्ते खेळतात, मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) दारु विकतात आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) कोट्यवधी रुपये कमवून घर भरत असल्याची टीका खैरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
आमच्याकडून दारु घ्यावी म्हणून भुमरे लोकांना सांगतात...
दरम्यान यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे गद्दार पाच आमदार महामूर्ख आहेत, बदमाश आहेत. ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांनाच आज ते विसरले आहेत. संदिपान भुमरे हे पालकमंत्री असले तरीही त्यांना घाबरायचं नाही. भुमरे हे फक्त दारुची दुकाने उघडून बसले आहेत. त्यांची दारुची 16 दुकाने आहेत. आमच्याकडून दारु घ्या, असं ते लोकांना सांगतात. त्यामुळे आता पैठणला उठाव झाला पाहिजे. तर पालकमंत्री भुमरे गेल्यावेळी पानंद रस्त्याचे मंत्री होते आणि त्यावेळी ते 30 टक्के घ्यायचे. मात्र आता सुद्धा ते 12 टक्के घेतात, असेही खैरे म्हणाले.
सत्तार अधिकारी मित्राच्या मदतीने कोट्यवधी कमावत आहे...
दरम्यान याचवेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना खैरे म्हणाले की, सत्तार यांच्या तालुक्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सत्तार यांनी आपल्या एका जिल्हाधिकारी मित्राला जिल्ह्यात आणले आणि मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. आता त्याच अधिकाऱ्याला कृषी आयुक्त केले आणि कोट्यवधी रुपये खाणं सुरु आहे. कृषीमंत्री फक्त स्वतःचं घर भरत असल्याचे देखील खैरे म्हणाले.
शिरसाट-बोरणारेंवर टीका...
तसेच यावेळी बोलताना खैरे यांनी संजय शिरसाट आणि आमदार रमेश बोरणारे यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय शिरसाट हे फक्त पत्ते खेळत असतात. आधी रिक्षा चालवत होते आता कोट्यवधी रुपये कोठून आले. तर बोरणारे हे गेलेली केस असल्याचं खैरे म्हणाले आहेत. तर शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना जनता माफ करत नाही आणि देव देखील माफ करत नाही. अलिबाबा चाळीस चोरांपैकी एकही जिंकणार नाही. जे बाहेर गेले आता त्यांना परत घ्यायचं नाही, असेही खैरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
खैरेंनी औकात काढली, भुमरे म्हणाले लोकसभेत दाखवतो'; लोकसभा निवडणुकीवरून शिंदे-ठाकरे गटात वाद पेटला