Rishabh Pant Ind vs SA : ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
भारतीय अ संघाचा कर्णधार ऋषभ पंत दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुखापतीतून सावरत पुन्हा मैदानात उतरला.

India A vs South Africa A, 2nd Unofficial Test : भारतीय अ संघाचा कर्णधार ऋषभ पंत शनिवारी, 8 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुखापतीतून सावरत पुन्हा मैदानात उतरला. त्याच्या पुनरागमनाने भारतीय संघ व्यवस्थापनासोबतच चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला. मैदानात परतल्यानंतर पंतने आपल्या ओळखीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत फक्त 54 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने तब्बल 120 च्या स्ट्राईक रेटने 65 धावा केल्या.
बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये चाललेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतला केवळ 20 मिनिटांत तिनदा दुखापत झाली. शेपो मोरेकीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स पुल करताना चेंडू प्रथम हेल्मेटला, नंतर उजव्या कोपराला आणि त्यानंतर पोटात लागला. प्रत्येक वेळी तो वेदनेत दिसत होता. संघाचा फिजिओ प्रत्येक वेळेस मैदानात धावून गेला. त्यावेळी पंत 17 चेंडूंवर 20 धावांवर खेळत होता. अखेर मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून पंतला तिसऱ्यांदा ‘रिटायर्ड हर्ट’ घोषित करून पॅव्हेलियनकडे बोलावलं, जरी पंत खेळ सुरू ठेवण्यास तयार होता.
मैदानावर पुनरागमन आणि वादळी खेळी
यानंतर ध्रुव जुरेल आणि हर्ष दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी 184 धावांची भक्कम भागीदारी उभारली. हर्ष 84 धावांवर बाद झाला, त्यानंतर पंत पुन्हा मैदानावर उतरला आणि त्याने आपली ओळख सांगत तुफानी 65 धावा ठोकल्या. अखेर काईल सिमंड्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेसमोर 417 धावांचे लक्ष्य
भारतीय अ संघाने 89.2 षटकांत 7 बाद 382 धावा करून डाव घोषित केला. ध्रुव जुरेल 127 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिका ‘अ’समोर विजयासाठी तब्बल 417 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका अ संघाने 11 षटकांत बिनबाद 25 धावा केल्या. जॉर्डन हरमन 15 आणि लेसेगो सेनोक्वाने 9 धावांवर खेळत आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.
भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)
- पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
- दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
- पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
- दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
- तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
- पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)
- दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)
- तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)
- चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
- पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)
हे ही वाचा -
Los Angeles Olympics 2028 Cricket News : पाकिस्तानसाठी आता ऑलिम्पिकचे दरवाजे बंद? ICCने दिला स्पष्ट अपडेट, टीम इंडियाचं काय झालं? जाणून घ्या सर्वकाही





















