Shambhuraj Desai on Sanjay Rathod : संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी, शंभूराज देसाई म्हणतात...
Shambhuraj Desai on Sanjay Rathod : "संजय राठोड यांना चौकशी यंत्रणेने क्लीन चिट दिली आहे. तरी त्यांच्यावर टीका करायची हे केवळ राजकीय वळण लावण्याचं काम आहे," असं शंभूराज देसाई म्हणाले. शपथविधीनंतर एबीपी माझाशी संवाद साधताना शंभूराज देसाई बोलत होते.
Shambhuraj Desai on Sanjay Rathod : एकीकडे भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा मंत्रिपदाचा मान मिळाल्याने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला असताना, नवनियुक्त कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) मात्र संजय राठोड यांचा बचाव करताना दिसले. "संजय राठोड यांना चौकशी यंत्रणेने क्लीन चिट दिली आहे. तरी त्यांच्यावर टीका करायची हे केवळ राजकीय वळण लावण्याचं काम आहे," असं शंभूराज देसाई म्हणाले. शपथविधीनंतर एबीपी माझाशी संवाद साधताना शंभूराज देसाई बोलत होते.
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ म्हणजे एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मागील सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांना या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली ती पूर्ण करणार, असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांना अपेक्षित काम करण्याचा प्रयत्न : शंभूराज देसाई
शंभूराज देसाई म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांना अपेक्षित काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करणार. मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असणारं चांगलं काम, राज्याला विकासाच्या बाबतीत एक नंबरवर नेण्याचं काम आम्ही युतीच्या सरकारमध्ये सगळे जण मिळून करु."
'चौकशी अहवालात संजय राठोड दोषी नसल्याचं सिद्ध'
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, त्यांचं नाव शपथ घेणाऱ्यांच्या यादीत झळकलं. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेले वर्षभर चहूबाजूंनी होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागली. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले की, "संजय राठोड यांना चौकशी यंत्रणेने क्लीन चिट दिली आहे. त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, अशाप्रकारचा अहवाल यंत्रणेने गृहविभागाकडे पाठवला आहे. असं असताना वारंवार म्हणायचं ते दोषी आहेत. आपण दोषी नसल्याचं ते पहिल्या दिवसापासून सांगत होते. तरी सुद्धा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर राहावं लागलं. आता चौकशी अहवाल आला. त्यामध्ये ते दोषी नसल्याचं सिद्ध झालं. तरी त्यांच्यावर टीका करायची हे केवळ राजकीय वळण लावण्याचं काम आहे."
कोणीही नाराज नाही, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार : शंभूराज देसाई
लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. तसंच "कोणीही नाराज नाही. 51 पैकी एकही आमदार नाराजीबद्दल बोललेला नाही. पण अशापद्धतीच्या वावड्या उठवून त्याला वेळं वळण लावण्याचं काम केलं जात आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला सर्व 51 आमदार उपस्थित होते, त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचं सांगितलं," असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.
Shambhuraj Desai : Sanjay Rathod यांना मंत्रिपद का? शंभूराज देसाईंनी सांगितलं कारण ABP Majha