मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहे.
मुंबई : महाविकास आघाडीनं (MVA ) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं. लोकसभेच्या 48 जागांपैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या पारड्यात केवळ 17 जागा गेल्या. सांगलीतून अपक्ष उमेदवार विजयी झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) यांना 9, काँग्रेसला (Congress) 13, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षाला 8 जागांवर विजय मिळाला. तर, महायुतीत भाजपला 9, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. तर, सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. महाविकास आघाडीला मिळालेल्या या यशामध्ये मित्रपक्षांचा देखील पाठिंबा होता. आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. मविआतील तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी 96 जागा या प्रमाणं जागा वाटप होईल अशा चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांनी देखील त्यांची भूमिका जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेला मविआला पाठिंबा देणाऱ्या माकपनं (CPM) काँग्रेसकडे 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे.
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत माकपनं पाठिंबा जाहीर केला होता. माकपनं राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात व राज्यात तीव्र होत असलेल्या शेतकरी, शेतमजूर व कामगार कर्मचाऱ्यांच्या तीव्र होत असलेल्या विविध प्रश्नांबाबत आज माकपच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ नेते नरसय्या आडम व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यामध्ये आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे.पी.गावीत, डॉ. डी.एल.कऱ्हाड, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
लोकसभा निवडणुकीत दिलेल्या राज्यभरातील माकपच्या भरीव योगदानाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत माकपला किमान 12 जागा महाविकास आघाडीने सोडाव्यात यासाठीचा प्रस्ताव आज माकपच्या वतीने त्यांना देण्यात आला. .
माकपनं कुठल्या जागांचा प्रस्ताव दिला?
डहाणू व विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे), कळवण, नाशिक (पश्चिम), दिंडोरी आणि इगतपुरी (नाशिक), सोलापूर (मध्य), अकोले (अहमदनगर), माजलगाव (बीड), किनवट (नांदेड) आणि पाथरी (परभणी) हे विधानसभा मतदार संघ लढविण्याची जोरदार तयारी माकपने सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. मागील आठवड्यात शरद पवार यांचीही माकपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. लवकरच उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना किती जागा सोडणार हे पाहावं लागेल. काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मविआ म्हणून लढवण्याची निश्चित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आहे.
संबंधित बातम्या :
विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित; महायुतीचा तिढा कायम?