Mahadev Jankar : पंकजाताईंकडून राखी बांधताच महादेव जानकर यांची मन की बात, म्हणाले सुप्रियाताई अन् अजितदादांनी एकत्र यावं...
Mahadev Jankar : रासपचे नेते महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं म्हटलं आहे.पंकजा मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतल्यानंतर जानकर यांनी ही भावना व्यक्त केली.
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या घरी उपस्थित राहून रक्षाबंधन सण साजरा केला. पंकजा मुंडे यांनी राखी बांधल्यानंतर महादेव जानकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जानकर यांनी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकत्र यावं, असं म्हटलं. महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील रक्षाबंधन 12 वर्षांनंतर झाल्याची आठवण देखील त्यांनी करुन दिली.
महादेव जानकर काय म्हणाले?
रासपचे नेते महादेव जानकर यांनी गोपीनाथ मुंडे यांनी 13 वर्षापूर्वी मुलगा मानलं तेव्हा पासून दरवर्षी पंकजाताई यांच्या हस्ते राखी बांधून घेतो. यात एकदाही खंड पडला नाही, असं म्हटलं. पंकजाताई, प्रीतमताई,ॲड. यशश्री यांच्याकडून राखी बांधून घेतो, असंही जानकर यांनी सांगितलं.
सुप्रियाताई अजितदादांनी एकत्र यावं
पंकजा मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना आमचा पक्ष महायुतीचा घटक असल्याचं महादेव जानकर म्हणाले. लोकसभेला आमच्या पक्षाला एक जागा देण्यात आली होती. महायुतीचा घटकपक्ष म्हणून राज्यात आमचं सरकार पुन्हा एकदा यावं, असंही जानकर म्हणाले.
राज्यात पुन्हा लाडकी बहीण योजना सुरु राहण्यासाठी सर्व बहिणींनी आशीर्वाद द्यावा, असंही महादेव जानकर म्हणाले. पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचं 12 वर्षानंतर रक्षाबंधन झालं होतं. आज पंकजाताईंनी राखी बांधली त्यावेळी धनंजय मुंडे देखील इथं होते, असंही जानकर यांनी म्हटलं. राजकारणाच्या परीनं राजकारण होईल पण सुप्रियाताई आणि अजितदादा यांनी एकत्र यावं अशा सदिच्छा असल्याचं जानकर यांनी म्हटलं. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील रक्षाबंधनासाठी पंकजा मुंडे यांच्या घरी हजेरी लावली होती.
महायुतीचं सरकार यावं
महादेव जानकर यांनी महायुतीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. महादेव जानकर यांनी या मतदारसंघातून चांगली लढत दिली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या महायुतीला संधी द्यावी, असं जानकर म्हणाले. यासाठी महादेव जानकर यांनी लाडकी बहीण योजनेचा दाखला दिला. लाडकी बहीण योजना पुन्हा सुरु ठेवण्यासाठी आमच्या सरकारला पुन्हा संधी द्यावी, असं महादेव जानकर म्हणाले.
संबंधित बातम्या :