(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! महाविकास आघाडीची 'मातोश्री'वर निर्णायक बैठक, जागावाटपावर तोडगा निघणार?
उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार असून ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवार जाहीर करणार, आजच्या बैठकीला महत्त्व
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर वाद आहे. याच जागांवर तोडगा काढण्यासाठी मविआच्या घटकपक्षांत अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांनंतर काही जागांवरील वाद मिटवण्यात मविआला यशही आले आहे. आज पुन्हा एकदा संध्याकाळी पाच वाजता मविआची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवारांसह इतर प्रमुख नेत उपस्थित असणार आहेत. 26 मार्च रोजी शिवसेना आपल्या 15 ते 16 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. त्यामुळे आजची ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. मात्र काँग्रेसने आपल्या वाटाच्या 12 जागांवर अगोदरच उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचितच्या समावेशाचे आव्हान
महाविकास आघाडीमध्ये एकीकडे जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षालादेखील मविआत समाऊन घेण्याचे त्यांच्यावर आव्हान आहे. मविआमध्ये 15 जागांसाठी वाद चालू आहे. त्यांनी त्यांचा वाद अगोदर मिटवावा नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, अशी भूमिका आंबेडकर यांनी घेतलेली आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेशी झालेली आमची युती आता संपुष्टात आलेली असेही त्यांनी सांगितलेले आहे. तर दुसरीकडे आम्ही वंचितला चार जागा देण्यासाठी तयार आहोत. आमचा प्रस्ताव अजूनही कायम आहे, असे मविआतील नेत्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे वंचित बहुनज आघाडी अद्याप अधिकृतपणे मविआचा भाग झालेली नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा >>
Raju Parwe : महायुतीचं ठरलं, रामटेकमधून राजू पारवेच उमेदवार, 'या' तारखेला उमेदवारी अर्ज भरणार!
सोलापूरचा भाजप उमेदवार ठरला, प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंमध्ये होणार लढत