माढा विधानसभेला शरद पवार गटाकडून कोण? संजय पाटील घाटणेकरांचा दावा, आज घेतली पवारांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संजय पाटील घाटणेकर यांनी माढा विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माढा विधानसभेच्या (Madha Vidhansabha Election) जागेवर त्यांनी दावा केला आहे.
Madha Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या दोन ते तीन महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच माढा विधानसभा मतदारसंघ देखील जोरदार चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून संजय पाटील घाटणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माढा विधानसभेच्या (Madha Vidhansabha Election) जागेवर त्यांनी दावा केला आहे. या अनुषंगानेच त्यांनी आज सकाळी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे घाटणेकर म्हणाले.
मी अनेक वर्षापासून काम करतोय, मला निवडणूक लढण्याची संधी मिळावी
संजय पाटील घाटणेकर यांनी आज शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन माढा विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी देखील केली आहे. माढा विधानसभेवर माझा दावा असल्याचे घाटणेकर म्हणाले. मी अनेक वर्षापासून काम करत आहे. मला जर माढा विधानसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. मोहिते पाटील असतील, सहकारी पक्ष असतील. जुने कार्यकर्ते असतील यांना सोबत घेऊन काम करु असे संजय पाटील घाटणेकर यांनी सांगितलं. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकी दिली आहे. त्यांनी देखील विधानसभेला मदत करावी, अशी आशा संजय पाटील घाटणेकरांनी व्यक्त केली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांनी तिकीट द्यावे असे घाटणेकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कोण निवडणूक लढवणार?
गेली सहा टर्म माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे बबनदादा शिंदे आहेत. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून शरद पवार यांची ओळख होती. मात्र, राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. सध्या अजितदादा गटात असणारे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे हे यावेळी निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरु आहेत. गेले काही दिवस तब्येतीचा त्रास सुरु झाल्याने यावेळी ते त्यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे याना उभे करु शकतात. विधानसभेच्या दृष्टीनं रणजित शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघात दौरेसुद्धा सुरु केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Madha : माढा विधानसभेसाठी शरद पवारांची नवी खेळी, ओबीसी मतांच्या बेगमीसाठी शिवाजी कांबळेंना संधी मिळणार