Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांची उत्तम जानकरांशी डील फायनल? वेळापूरमध्ये बैठक, शहाजीबापूंची उपस्थिती, मोहिते पाटलांविरोधात शड्डू ठोकणार का?
Madha Loksabha : धनगर नेते उत्तम जानकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक सुरु झाली आहे.
Madha Loksabha : धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांची प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खास विमान पाठवून नागपूरमध्ये (Nagpur) जानकर यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यानंतर माढा लोकसभेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आज निर्णय जाहीर करणार, असे उत्तम जानकर म्हणाले होते. नागपूर येथून थोड्या वेळापूर्वी परत आलेल्या जानकर यांनी वेळापूर येथील त्यांच्या गरुड निवासस्थानी सुरू केली बैठक सुरु आहे. जानकर यांच्या सोबत आमदार शहाजी बापू पाटील, भाजप नेते पांडुरंग वाघमोडे उपस्थित आहेत. जानकर थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. उत्तम जानकर हे धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देणार होते. उत्तम जानकर आणि आम्ही एकत्र आलो तर माळशिरसमधून सव्वा लाखाचा लीड घेऊ असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीसांना माहिती मिळताच त्यांनी उत्तम जानकरांना गळाला लावण्यासाठी खास विमान पाठवलं आहे.
फडणवीसांच्या बैठकीनंतर काय म्हणाले होते जानकर?
फडणवीस यांच्यासोबत नागपूरमध्ये बैठक पार पडल्यानंतर जानकर म्हणाले, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमच्या अडचणी आणि मुद्यांवर चर्चा केली. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी आम्ही फडणवीस यांच्यासमोर मांडल्या आहेत. माढा आणि सोलापूर लोकसभेबाबत आम्ही चर्चा केली असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले होते.
रणजित निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहितेंनी शड्डू ठोकला
विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या कामावरुन जोरदार टीका करत धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवाय, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांची माढा लोकसभेतून उमेदवारी फायनल झाली. त्यामुळे माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, धैर्यशील मोहिते पाटलांसाठी ही निवडणूक सोपी नाही. कारण महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या मतदारसंघात मोठी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
माढ्याचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, विशेष विमानाची नागपूरवारी यशस्वी ठरण्याची चिन्हं, फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तमराव जानकर म्हणाले...