जिल्हाधिकाऱ्यांनी 1500 पोस्टल मतदान मोजलंच नाही; पंकजा मुंडेंनी सांगितलं मतमोजणीवेळी रात्री काय घडलं
बीडमधील लोकसभा निवडणुकांचा पराभव मान्य असल्याचे सांगत आता पुढील निवडणुकांच्या तयारीला आपण लागणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
बीड : लोकसभा निवडणुकीत सर्वात चुरशीची लढत ठरली ती बीड लोकसभा (Beed loksabha) मतदारसंघात. बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. अगदी पहिल्या फेरीपासून शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत मुंडे आणि सोनवणे यांच्यातील मतांची आघाडी-पिछाडी पाहायला मिळाली. अखेर, या निवडणुकीत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांना विजयी घोषित केले. त्यामुळे, राज्यातील सर्वात शेवटचा निकाल बीड लोकसभा मतदारसंघात लागला. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे व पंकजा मुंडे (pankaja Munde) यांच्या समर्थकांमध्ये मतमोजणीवरुन गोंधळ निर्माण झाला होता. पंकजा यांनीही बीडमध्ये जाऊन मतदान मतमोजणी केंद्रावर पाहणी केली होती. त्यामुळे, सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. आता, तेव्हा नेमकं काय घडलं, याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी 1500 पोस्टल मतं मोजलीच नाहीत, अशी माहितीही दिली.
बीडमधील लोकसभा निवडणुकांचा पराभव मान्य असल्याचे सांगत आता पुढील निवडणुकांच्या तयारीला आपण लागणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, पराभव पचवून पुन्हा नव्या जोमाने पुढील तयारीला लागायचे असते, हे मुंडेसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. मला मतदान करणाऱ्या सर्वच मतदारांचे आभार, असे म्हणत पंकजा मुंडेंनी निवडणूक पराभवावर भाष्य केलं.
राज्यात अनेक नेते मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामध्ये, कुणी 1 लाखाच्या तर कुणी 1.5 लाखाच्या फरकाने पराभूत झाले आहेत. मी जेव्हा मतदान केंद्रावर आले होते, तेव्हा 2200 मतांनी मी पाठिमागे होते, ते अंतिम मतमतमोजणीचं होतं. त्यामुळे, अंतिम मतमोजणीत काही मतं चुकीच्या पद्धतीने लागली गेली आहेत, असा आमच्या लोकांचा आक्षेप होता. एजंटकडून लिहिताना राहिलं गेलं आहे, वैगरे असं होतं. त्यामुळे, तुम्ही फेर मतमोजणीचा अर्ज करा, अशी मागणी माझ्या तेथील पोलिंस एजंटने केली. त्यानंतर, मी फेर मतमोजणीचा अर्जही केला, पण जिल्हाधिकाऱ्यांनी तो अर्ज फेटाळला. निकाल जाहीर करणार नाही, असेही ते म्हटले, पण निकाल जाहीर केला. 2200 वरील आघाडीवरुन तो निकाल 6 हजारांवर गेला.
प्रीतमताईंपेक्षा मला अधिक मतं
मी पालकमंत्री असताना प्रीतम मुंडेंना जेवढी मतं पडली, त्याहून अधिक मतं मला पडली आहेत. समोरच्या उमेदावारांत आणि माझ्यात जो 2 हजार मतांचा फरक होता, त्यावरुन मी झिरो पाँईंट झिरो वन अशा निसटत्या फरकाने पराभूत झाले, असे म्हणता येईल. त्यामुळे, ज्यांनी मला मतदान केले, त्या सर्वांचे मी आभार मानते. राज्यात एकूणच जे वातावरण होतं, त्यामुळेच निवडणुकीच्या पराभवाचा सामना करावा लागला आहे, असे पंकजा यांनी म्हटले.
शेवटच्या फेरींमध्ये समर्थकांची इच्छा
2200 ते 2 हजारांवरुन मतांचा जो फरक होता, तो 6 हजारांवर कसा गेला या अनुषंगाने पंकजा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी जेव्हा परळीहून बीडकडे निघाले होते तेव्हा 43 हजारांचा लीड होता. त्यामुळेच, लोकांची इच्छा होती की बेरीज तपासून पाहिली पाहिजे. त्यामुळे तो प्रश्न राहिलच, शिवाय सगळीकडे फेर मतमोजणी झाली, पण इथे होऊ शकली नाही, अशी खंतही पंकजा यांनी व्यक्त केली आहे.
1500 पोस्टल मतं मोजलीच नाहीत
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम निकाल दिल्यानंतर कोर्टात किंवा कुठेही जाण्यात काही अर्थ नसतो, मी अगोदरच 2200 मतांच्या फरकावरही काही बोलले नव्हते, मी तेही स्वीकारले होते. मात्र, बुथ केंद्रावरील आमच्या एजंटची खूप इच्छा होती. कारण, त्यांनी मला काही दाखवलं, तिथं मतं उलटी लिहिण्यात आल्याचं सांगितलं. त्यामुळे, आम्ही मागणी केली होती. विशेष म्हणजे जवळपास 1500 पोस्टल मतं जिल्हाधिकाऱ्यांनी मोजलीच नाहीत. आम्ही ती मतं मोजावीत, असे अपील केलं होतं. कारण, मतदारांच्या मतदानाचा अधिकार आहे, तो पाहता ते 1500 मतं मोजलेच पाहिजे, अशी आमची मागणी होती.पण, तीही मतं मोजण्यात आली नाही, ती पाकिटं तशीच ठेवण्यात आली. दोन पाकिटं क्षुल्लक कारणं देत उघडलीच नाहीत, असेही पंकजा मुंडेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.