BJP MNS Alliance: भाजपकडून मनसेला महायुतीच्या चिन्हावर लढण्याची अट, अमित ठाकरे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?
Maharashtra Politics: रेल्वे इंजिन यार्डातच राहणार, भाजपकडून मनसेला महायुतीमधील एका पक्षाच्या चिन्हावर लोकसभा लढण्याची अट. राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली. मनसेने महायुतीमधील तीन पक्षांपैकी कोणत्याही एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे सांगण्यात आले आहे.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह यांनी मंगळवारी दिल्लीत भेट झाली होती. या भेटीत बंद दाराआड मनसे-भाजप युतीबाबत चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे मुंबईत परतले. मात्र, अमित शाह (Amit Shah) आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर येऊ शकला नव्हता. परंतु, महायुती मनसेसाठी लोकसभेच्या एक ते दोन जागा सोडू शकते, अशी चर्चा सुरु झाली होती. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघ यापैकी दोन मतदारसंघातून मनसेचा (MNS) उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, मनसेच्या उमेदवाराने रेल्वे इंजिन या चिन्हावर नव्हे तर महायुतीमधील भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या तीनपैकी एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट राज ठाकरे यांना घालण्यात आल्याचे समजते. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मनसेला फक्त एका दिवसाचा अवधी देण्यात आला आहे.
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाच्या 'झीरो अवर' या कार्यक्रमात बोलताना याबाबत माहिती दिली. दीपक केसरकर यांनी म्हटले की, राज ठाकरे हे मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही होते. परंतु, माझ्या ऐकीव माहितीनुसार, त्यांनी महायुतीमधील एखाद्या पक्षाचे चिन्ह घ्यावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. कारण या तीन पक्षांचे चिन्ह लोकांना माहिती झाले आहे. आम्ही या चिन्हांचा प्रचारही केला आहे. पण अंतिम निर्णय हा अमित शाह यांनीच घ्यायचा आहे. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात नेमकं काय ठरलंय, हे मला माहिती नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या महायुतीतील समावेशाबाबत लवकरच गोड बातमी मिळू शकते. अद्याप महायुतीचे जागावाटप निश्चित व्हायचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेसाठी जागा सोडल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाट्याला किती जागा येणार, हे ठरवावे लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
अमित ठाकरे दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार?
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर भाजपकडून मनसेसाठी लोकसभेच्या दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघापैकी दोन जागा मनसेच्या वाट्याल येऊ शकतात. यापैकी शिर्डी लोकसभेच्या जागेवरुन मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरु शकतात. तर दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबईतून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता काही राजकीय जाणकारांनी बोलून दाखवली आहे. तसे घडल्यास अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यानंतर निवडणूक लढवणारी ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती ठरतील.
आणखी वाचा
राज ठाकरे-अमित शाहांची दिल्लीत भेट, महायुतीचा फायदा काय? भाजपला काय मिळणार? 5 मुद्द्यांत समजून घ्या!