Beed : बीडमध्ये चाललंय काय? बोगस मतदानाचे व्हिडीओ बाहेर, फेरमतदान घेण्याची शरद पवार गटाकडून मागणी
Beed Lok Sabha Election : राज्यातील सर्वाधिक मतदानाचा टक्का बीडमध्ये झाला असला तरी त्या ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहेत.
बीड : राज्यामध्ये अनेक लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यामध्ये बीडची चर्चा मात्र जोरात असल्याचं दिसतंय. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने बोगस मतदान केल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला असून आता त्या ठिकाणी फेरमतदान घेण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मतदानाचे व्हिडीओ व्हायरल
बीडमधील बोगस मतदानाचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने थेट निवडणूक आयोगाकडेच या व्हिडीओचा पुरावा देत बीड जिल्ह्यात कशाप्रकारे बोगस मतदान झाले हे दाखवून दिले. कुठे मतदान कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जातेय तर कुठे मतदारावर दबाव टाकला जात असल्याचं यातून दिसतंय.
याच बोगस मतदानाची आधी रोहित पवार यांनी, त्या नंतर स्वतः शरद पवार यांनी सुद्धा तक्रार करत बीड जिल्ह्यात फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे 13 तारखेला मतदान झाल्यानंतर त्याच रात्री बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे 22 गावांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला होता.
बोगस मतदानाचा आरोप करण्यात आलेली गावे
परळी मतदार संघातील मौजे इंजेगांव, सारडगांव, धर्मापुरी, डिग्रस, नाथ्रा, कौडगांव साबळा, जिरेवाडी, वालेवाडी व कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्रावर व मतदान केंद्र क्रमांक 188, 189, 132 व 161 आणि केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव माजलगांव मधिल गोविंदवाडी व धारुर मधिल सोनिमोहा, पिपरवडा, मंदवाडी व चाडगांव आष्टी मधिल वाली आणि पाटोदा मधिल वाधीरा हे वरिल सर्व मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात जास्त तक्रारी
बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त तक्रारी झाल्या त्या धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात. या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन गीते यांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी करून मतदान कोणी केल्याचा जाब विचारण्याचे व्हिडीओ सुद्धा आता व्हायरल होत आहेत.
दरम्यान बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा प्रचार झाला अथवा कशाप्रकारे लोकांनी आम्हाला भरघोस मतदान दिलं हे सांगत असतानाच आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर देऊ असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या सोबतच धनंजय मुंडे यांच्यावरसुद्धा बोगस मतदान केल्याचा आरोप केला जात आहे.
शरद पवार गटाकडून एकानंतर एक व्हिडीओ शेअर
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. केवळ मराठवाडा नाही तर राज्यभरात सर्वाधिक मताचा टक्का हा बीड जिल्ह्यातील राहिला तो 70.92 इतका होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान झाल्यानंतर एकानंतर एक व्हिडीओ बाहेर काढले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे खुलासा मागितला.
एकीकडे बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक ही मोठ्या संघर्षाची झाली होती, या निवडणुकीला आधीच जातीय संघर्षाची किनार असताना आता बोगस मतदान झाल्याचा आरोप सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. बीडच्या जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कुठेही बोगस मतदान झाले नसल्याचे सांगितले असले तरी निवडणूक आयोगाला मात्र राष्ट्रवादीच्या या तक्रारीनंतर विचार करावा लागेल हेही तितकेच खरे.
ही बातमी वाचा: