(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसची अवस्था 'घर का भेदी लंका ढाए', बाहेरच्यांपेक्षा घरातल्यांमुळे काँग्रेसची अडचण; आधी पित्रोदा आता मणिशंकर अय्यर बरळले
सॅम पित्रोदांच्या वारसा कर आणि भारतीयांच्या वर्णभेदी वक्तव्यावरून काँग्रेसचं तोंड पोळलेलं असताना आता मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतण्याचं काम केलंय.
नवी दिल्ली : निवडणूक (Election 2024) आम्हीच जिंकणार असे दावे-प्रतिदावे भाजपकडूनही (BJP) सुरू आहेत आणि काँग्रेसकडूनही (Congress) आरोपही होत आहेत. कुरघोड्याही केल्या जात आहेत. पण ऐन निवडणुकीच्या मध्यावर सध्या काँग्रेसकडून, भाजपच्या हातात आयतं कोलित दिलं जातंय. भाजपची विजयाची हॅटट्रिक होऊ नये, यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या देशभर प्रचार, सभा घेत आहेत. विद्यमान सरकारवर आरोपांचा भडीमारही करत आहेत. पण काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांमुळे, भाजपचा मार्ग मात्र सुकर होत असल्याचं चित्र दिसत आहे.
नुकतंच सॅम पित्रोदांच्या वारसा कर आणि भारतीयांच्या वर्णभेदी वक्तव्यावरून काँग्रेसचं तोंड पोळलेलं असताना आता मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे ते भारताने विसरू नये. पाकिस्तानचा आदर केला तर ते शांत राहतील. आपण त्यांना कमी लेखत राहिलो तर लाहोरमध्ये कुणीतरी वेडा येईल आणि बॉम्ब टाकेल. भारताची पाकिस्तानशी चर्चा बंद असल्याच्या भूमिकेवर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. काही दिवसांपूर्वीच ईडी आघाडीचे नेते फारूख अब्दुल्लांनीही असंच वक्तव्य केलं होतं. विरोधकांच्या या वक्तव्यानंतर गृहमंत्री अमित शाहांनी पुन्हा एकदा, पाकव्याप्त काश्मीर भारताचाच असल्याची गर्जना केली आहे.
#WATCH | Jharkhand: Addressing a public rally in Khunti, Union Home Minister Amit Shah says, "Today Mani Shankar Aiyar is threatening us, he is asking us to respect Pakistan because they have an atomic bomb. A few days ago, Farooq Abdullah asked us to not talk about PoK because… pic.twitter.com/ubQzLGH94n
— ANI (@ANI) May 10, 2024
ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेसविरोधात वातावरण तापवण्यासाठी भाजपला आणखी एक मुद्दा सापडला आहे. अमेरिकेत असलेले काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदांनी, संपत्तीच्या पुनर्वितरणासाठी भारतात वारसा कर कायद्याची वकिली केली होती. सॅम पित्रोदा म्हणाले होते की, अमेरिकेमध्ये वारसाहक्क कर पद्धत आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे 10 कोटींची संपत्ती आहे. तर त्याच्या मृत्यूनंतर केवळ 45 टक्केच संपत्ती ही त्याच्या मुलांना मिळते. 55 टक्के संपत्तीवर सरकारचा हक्क असतो. पण भारतात असा कायदा नाही. एखाद्याकडे 100 कोटी असले, तर त्याच्या मृत्यूनंतर ती संपूर्ण संपत्ती त्याच्या मुलांना मिळते. लोकांना त्यातलं काही मिळत नाही. पण कायदा सांगतो की जनतेला त्यात अर्धा वाटा मिळायला हवा. पित्रोदांच्या या वक्तव्याचा मोदींनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसचा आता सर्वसामान्यांच्या संपत्तीवर डोळा असल्याची टीका त्यांनी केली. हा वाद शमतो न शमतो तोच, पुन्हा एकदा पित्रोदांनी अमेरिकेत बसून भाजपला टीकेची आयती संधी दिली.
या वक्तव्याने हतबल काँग्रेस मैलोन मैल दूर पळालं. त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगत बचावात्मक पवित्रा घेतला. पण मोदींनी तेलंगणातील वारंगळच्या सभेतून वर्णाच्या आधारे समाजामध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही असा हल्लाबोल केला.
दोन आठवड्यात दोन वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस अडचणीत
अखेरीस दोन आठवड्यात दोन वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसची चांगलंच अडचणीत आणल्यानंतर पित्रोदांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यातून सुटकेचा दीर्घ श्वास घेतो न घेतो, तोच आता मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानवरील वक्तव्यामुळे, काँग्रेसची नक्कीच कोंडी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी असलेल्या काही नेत्यांनीच काँग्रेसला अडचणी आणण्याचा विडा उचललाय का? अशी चर्चा रंगलीय. अर्थात या वादग्रस्त विधानांचा काँग्रेसला लोकसभेच्या उर्वरीत टप्प्यांमध्ये फटका बसतो का? हे चार जूनलाच कळणार आहे.
हे ही वाचा :