तीच तारीख, शहरही तेच! रत्नागिरीत मनसे-शिवसेनेची एकाचवेळी सभा; राजकीय वातावरण तापणार!
रत्नागिरीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी एकाच वेळेला सभा होत आहे. या सभांच्या पार्श्वभूमीवर सध्या रत्नागिरीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
रत्नागिरी :लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आता तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांत तळ ठोकून आहेत. येत्या सात मे रोजी मतदानाचा हा तिसरा टप्पा पार पडणार असून यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या (Ratnagiri Sindhudurg) भावी खासदाराचेही भवितव्य ठरणार आहे. दरम्यान याच रत्नागिरीत आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. 29 एप्रिल रोजी रत्नागिरी शहरात मनसे (MNS) आणि शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena Thackeray Group) यांची एकाच वेळी सभा होणार आहे.
सभेची तारीख एक, वेळही एकच
शिवसेना ( ठाकरे गट) पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे 29 एप्रिल रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधित करणार आहेत. दुसरीकडे याच वेळी मनसेनेदेखील आपली सभा आयोजित केली आहे. सभेच्या रुपात आता शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. रत्नागिरी शहरात संध्याकाळी सहा वाजता मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दोन वेगवेगळ्या सभा होणार आहेत.
मनसेकडून राणेंचा प्रचार
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या या सभांची वेळ एकच असल्याने आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच मनेसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा देत आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात मनसेकडून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला जातोय.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे- विनायक राऊत आमने-सामने
दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नाराण राणे हे भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवत आहेत. ते महायुतीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे विनायक राऊत हे राणे यांच्याशी दोन हात करत आहेत. राऊत यांच्याच प्रचारासाठी उद्धव ठाकर हे रत्नानगिरीत जात आहेत. राणे कुटुंबीय ठाकरे कुटुंबाचे प्रखर राजकीय विरोधक मानले जाते. नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकवेळा टीका करताना दिसतात. राणेंच्या या टीकेला उद्धव ठाकरेदेखील तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देतात. त्यामुळे रत्नागिरीत होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या सभेवेळीच दुसरीकडे मनसेचीही सभा होत आहे. त्यामुळे आता 29 एप्रिल रोजी रत्नागिरीत काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
हेही वाचा :