48 पैकी 21 मतदारसंघात मतदान घटलं, ठाकरे की शिंदे, काका की दादा, कुणाला धक्का, कुणाला फायदा?
2024 India elections : राज्यातील सर्व 48 मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीचा विश्लेषण केल्यावर ज्या मतदारसंघात दुभंगलेले किंवा फुटलेले पक्ष निवडणूक लढवत होते, त्या मतदारसंघात प्रामुख्याने मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे.
Loksabha Election 2024 : राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या. राज्यात पक्षांची संख्या वाढली, मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे राज्यात मागील 5 वर्ष सुरू असलेलं विश्वासघात आणि फोडाफोडीचं राजकारण याचा घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीशी काही संबंध आहे का ? राज्यातील सर्व 48 मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीचा विश्लेषण केल्यावर ज्या मतदारसंघात दुभंगलेले किंवा फुटलेले पक्ष निवडणूक लढवत होते, त्या मतदारसंघात प्रामुख्याने मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या संख्येनुसार महाराष्ट्र देशातील दुसरा सर्वात मोठं राज्य आहे. मात्र राज्यातील 48 मतदारसंघात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमीच दिसून आली. जर आपण 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तुलना केली, तर राज्यातील 48 मतदारसंघांपैकी 27 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी वाढलेली दिसते. तर 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे, त्यामध्ये एकतर दुभंगलेले पक्ष समोरासमोर होते, किंवा एक पक्ष तरी फुटलेला पक्ष होता.
राज्यातील 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली... त्या ठिकाणी दुभंगलेल्या पक्षांची स्थिती...
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी 8 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 5 मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यापैकी 4 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी 10 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली...
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी 4 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे...
राजकीय विश्लेषकांच्या मते मतदानाच्या टक्केवारी घसरलेल्या मतदारसंघाचं विश्लेषण केल्यावर स्पष्ट दिसतंय की, राज्यात गेले पाच वर्ष सुरू असलेलं विश्वासघात आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे कुठे तरी मतदारांना राजकारणाचाच वीट आला आहे. राज्यात नवीन पक्ष स्थापन झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते नेमके कुठल्या गटात आहेत याची स्पष्टता मतदारांना नव्हती. पक्षांच्या चिन्हाबाबतची अनेक मतदारांना संभ्रम होतं. परिणामी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
आता एकसंघ राहिलेल्या, न फुटलेल्या भाजप आणि काँग्रेसची स्थिती पाहूया...
भाजपनं 28 मतदार संघात निवडणूक लढवली, त्यापैकी 19 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तर 9 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे.
काँग्रेसने 17 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली, काँग्रेस लढवत असलेल्या 10 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तर फक्त 7 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे...
कुठल्याही मतदारसंघात मतदान वाढणे किंवा कमी होणे, त्यामागे अनेक कारणे असतात. मतदार याद्याची अचूकता, हवामान, तापमान, उमेदवार, राजकीय पक्षांचे संघटन अशी अनेक कारणं मिळून त्या मतदारसंघात मतदान होऊन मतदानाची टक्केवारी समोर येत असते. मात्र महाराष्ट्रात दुभंगलेल्या आणि फुटलेल्या पक्षांच्या मतदारसंघातच मतदानाची टक्केवारी का घसरली? ही फक्त फुटलेल्या दुभंगलेल्या पक्षांसाठीच चिंतेची बाब नाही. तर लोकशाहीच्या वर्तमान स्थिती संदर्भात मतदार राजाचा छुपा मात्र बोलका कौलही आहे.