Maharashtra Congress: मोठी बातमी: काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना लोकसभेची उमेदवारी, सांगलीत विशाल पाटीलच लढणार?
Loksabha Election candidate list: काँग्रेस पक्षाकडून लवकरच महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या यादीत 13 जणांचा समावेश आहे. विशाल पाटील यांना सांगलीतून मैदानात उतरवणार.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत 2014 आणि 2019 प्रमाणे नामुष्की ओढावून घ्यायची नाही, या इराद्याने मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांबाबत खल झाला. या बैठकीअंती महाराष्ट्रातील 13 उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा समावेश आहे.
नाना पटोले यांना काँग्रेसकडून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले जाईल. तर चंद्रपूर मतदारसंघासाठी इच्छूक असलेल्या प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार या दोघींनाही बाजूला सारत काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार यांनाच रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी देणे, ही राजकीयदृष्ट्या खूप मोठी बाब मानली जात आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अनुक्रमे 2 आणि एक जागा मिळाली होती. हे अपयश धुवून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता आपल्या मातब्बर नेत्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे.
याशिवाय, काँग्रेस पक्षाच्या संभाव्य यादीत सांगलीत लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. परंतु, काँग्रेस कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीनंतर समोर आलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत विशाल पाटील यांचाही समावेश आहे. त्यामुळे विशाल पाटील हेच मविआचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गट इच्छूक असलेल्या भिवंडीची जागाही काँग्रेसने आपल्याकडेच ठेवली आहे. काँग्रेस पक्षाकडून भिवंडीतून दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
काँग्रेस कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत देशभरातील 50 उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली आणि त्यापैकी बहुतांश नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीला राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून बुधवारी रात्री उशीरा किंवा बुधवारी सकाळी या 50 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 उमेदवारांचा समावेश असू शकतो.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
1. भंडारा-गोंदिया - नाना पटोले
2. चंद्रपूर - विजय वडेट्टीवार
3. अमरावती- बळवंत वानखेडे
4. नागपूर - विकास ठाकरे
5. सोलापूर - प्रणिती शिंदे
6. कोल्हापूर - शाहू महाराज
7. पुणे - रविंद्र धंगेकर
8. भिवंडी- दयानंद चोरगे
9. नंदुरबार - के सी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी
10. गडचिरोली- नामदेव किरसान
11. नांदेड - वसंतराव चव्हाण
12. लातूर - डॉ. शिवाजी काळगे
13. सांगली - विशाल पाटील