PM Modi: शरद पवार म्हणजे 'भटकती आत्मा'; पंतप्रधान मोदींचा घाव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला, इशारा देत म्हणाले...
PM Modi slams Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी हे सध्या शरद पवार यांच्यावर वारंवार टीका करताना दिसत आहेत. पुण्यातील सभेत मोदींनी शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हटले. ही भटकती आत्मा महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करत असल्याची टीका त्यांनी केली होती.
इंदापूर: पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी शरद पवार गटाचे नेते पुढे सरसावले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, नरेंद्र मोदी (PM Modi) हे रात्रंदिवस टीका करत असतात. त्यांनी शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला. पण नरेंद्र मोदींना 4 जूनच्या मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. ते सोमवारी इंदापूर येथील सभेत बोलत होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन केले. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे, तुमची मतं तुतारीला मिळतील, असे मी समजतो, असे त्यांनी म्हटले.
मोदींना शरद पवारांवर टीका करण्यापलीकडे काहीच जमत नाही: जयंत पाटील
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर केवळ पवार साहेबांवरच बोलणे त्यांच्यावर टीका करणे, याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची भाषणे ऐकली. मात्र, विरोधकांवर नाहक टीका करण्याचे काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केले नव्हते. मोदींचा 400 पारचा नारा आता बंद झाला आहे. आता भाजप 200 पारही जाणार नाही. मोदी आणि शाह यांनी मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले. याची शिक्षा मराठी माणूस त्यांना मतदानातून देणार आहे. अमित शाह यांनी गुजरातमध्ये केलेले एक काम सांगावे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
4 जूननंतर भाजपच्या नेत्यांना हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी मिळेल: रोहित पवार
मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवार यांनीही त्यांना ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे.. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला #अस्थिर_आत्मे दिसू लागले. आता 4 जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2024
नांदतो केवळ पांडुरंग!!
(संत एकनाथ महाराज)
मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे.. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन…
आणखी वाचा
हा मोदी आहे, घरात घुसून मारणार; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा