Dadar Kabutar Khana: मराठी एकीकरणचा गोवर्धन देशमुख जाणून बुजून मराठी-मारवाडी वाद पेटवतोय, जैन मुनींचा दावा, म्हणाले आजच्या आंदोलनात फक्त 200-300 लोक!
Jain Muni and Marathi Ekikaran Samiti: शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; राज ठाकरेंनाही घातलं साकडं, नेमकं काय म्हणाले? मारवाडी आणि मराठी हा वाद फक्त राज ठाकरेच मिटवू शकतात.

Dadar Kabutar Khana: गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख जाणीवपूर्वक मारवाडी विरुद्ध मराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. जैन मुनी अमुकतमूक बोलले सांगून स्वार्थासाठी आंदोलन करत आहे. दादरमधील आजच्या त्यांच्या आंदोलनाला फक्त 200 ते 300 लोक आले होते. त्यापेक्षा अधिक लोक आले होते का?, असा सवाल विचारत जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni) यांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला. वेळ पडल्यास शस्त्रं उचलू. न्यायालयाचा निर्णय जैन धर्माविरोधात जात असेल तर तो जुमानणार नाही, अशी भाषा काही दिवसांपूर्वी निलेशचंद्र विजय यांनी केली होती. त्यावरुन प्रचंड गदारोळ निर्माण झाल्यानंतर बुधवारी निलेशचंद्र विजय यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत नरमाईची भूमिका घेतली.
निलेशचंद्र विजय यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मारवाडी विरुद्ध मराठी वाद मिटवण्याचे आवाहन केले. जैन समाजाच्या लोकांच्या कारखान्यात आणि दुकानांमध्ये मराठी माणसं काम करतात. आम्हाला मराठीचा आदर आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. मारवाडी आणि मराठी हा वाद फक्त राज ठाकरेच मिटवू शकतात. आमची जन्मभूमी राजस्थान असली तरी आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करुन हा वाद संपवावा, अशी विनंती जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केली.
कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात जैन समाजाने सर्वप्रथम 3 ऑगस्टला गेट वे ऑफ इंडिया येथे शांततापूर्ण आंदोलन केले होते. जैन समाजाची आंदोलनं ही शांतताप्रिय असतात. त्यानंतर आम्ही 11 ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने आमची विनंती ऐकली. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी कबुतरखान्याचे दार खोलून कबुतरांना दाणे टाकण्याचे आदेश दिले. सरकारने समस्या सुटली असे सांगूनही मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावरील ताडपत्री काढली नाही. मी त्यादिवशी जे काही झाले त्याचे समर्थन करत नाही. पण खाद्य नसल्यामुळे आमच्या नजरेसमोर 20 कबुतरं मेली होती. त्यामुळे आंदोलन झाले. आम्ही शस्त्रं काढली, असे बोलले जाते. पण आम्ही शस्त्र कशाला काढू, आम्ही हिंदू आहोत. आम्ही मराठी माणसासाठी शस्त्रं काढले नव्हते. त्यादिवशी महिलांच्या हातात जे चाकू आणि सुरे होते ते बाबूंच्या दोऱ्या आणि ताडपत्री कापण्यासाठी होते, असे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले. मारवाडी माणूस 100 रुपये कमावत असेल तर त्यापैकी दोन रुपये जीवदयेसाठी वापरतो. सर्वात जास्त टॅक्स भरणारा जैन समाज आहे. सर्वात जास्त गोशाळा जैन समाज चालवतो. सर्वात जास्त प्राण्यांची रुग्णालये जैन समाजाकडून चालवली जातात. आम्ही कुत्रे, मांजरांसाठी रुग्णवाहिका चालवतो, असेही निलेशचंद्र विजय यांनी सांगितले.
आणखी वाचा
शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; राज ठाकरेंनाही घातलं साकडं, नेमकं काय म्हणाले?























