तर पक्षप्रवेश करा...; आता अंबादास दानवेंची इम्तियाज जलील यांना नवीन ऑफर
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना एवढेच इंडिया आघाडीवर प्रेम असेल तर त्यांनी आपला पक्ष बदलावा : इम्तियाज जलील
मुंबई : राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससह (Congress) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एमआयएमकडून (MIM) ऑफर देण्यात आली आहे. भाजपला (BJP) हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी म्हटले होते. दरम्यान, आता यावरूनच महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. "इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी पक्ष बदलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावे. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीत (India Alliance) यावे," अशी नवीन ऑफर जलील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.
जलील यांच्या प्रस्तावावर बोलतांना दानवे म्हणाले की, "इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी पक्ष बदलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावेत. इम्तियाज जलील यांना एवढेच इंडिया आघाडीवर प्रेम असेल तर त्यांनी आपला पक्ष बदलावा. तसेच, इम्तियाज जलील जरी इंडिया आघाडीत येण्याचं सांगत असेल, पण यासाठी त्यांच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का?," असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
जलील यांच्यावर टीका...
दरम्यान, याचवेळी बोलतांना अंबादास दानवे यांनी जलील यांच्यासह एमआयएम पक्षावर टीका देखील केली आहे. एमआयएम आणि आमच्या पक्षाचे वैचारिक रित्या जमणं कठीण आहे. शिवसेना (ठाकरे गट) एमआयएमला मानतच नाही. एमआयएम जातिवादी संघटना आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे, अपघाताने ती इम्तियाज जलील यांच्याकडे गेली आहे. तरीही जलील यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा असल्यास त्यांनी एमआयएम पक्ष सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा. कारण या दोन्ही पक्षात अनेक मुस्लिम नेते आहेत, असे दानवे म्हणाले.
वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया...
दरम्यान, जलील यांच्या प्रस्तावावर काँग्रेस पक्षाची देखील प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर बोलतांना म्हटले आहे की, "आघाडी कुणासोबत करायची, याबबात 29 तारखेच्या च्या बैठकीत चर्चा करू, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावे, आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवर 29 तारखेच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
काय म्हणाले होते जलील?
आमच्यावर भाजप बी टीमचा आरोप होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना युतीची ऑफर आम्ही दिली होती. त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी ही ऑफर अजूनही कायम आहे. भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्यासाठी माझी अजूनही ऑफर आहे. त्यांनी यासाठी विचार करावा. महाविकास आघाडीची युती कशी आहे त्यावर तिन्ही पक्षांनी विचार करावा. तसेच एमआयएमला सोबत घ्यायचं की नाही यावर त्यांनी निर्णय घ्यावा. तसेच महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर नक्की विचार करू. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: