(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताची ताकद वाढली, तर जगाची ताकद ही वाढेल; पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कमध्ये भारतीयांना केलं संबोधित
PM Modi in Denmark: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज डेन्मार्कला पोहोचले आहेत, जिथे त्यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली.
PM Modi in Denmark: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज डेन्मार्कला पोहोचले आहेत, जिथे त्यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कमध्ये स्थायी असलेल्या भारतीयांना संबोधित केले. भारत माता की जयच्या घोषणा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांची येथे उपस्थिती भारतीयांप्रती असलेल्या त्यांच्या आदराचा पुरावा आहे. जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा जगाची ताकदही वाढते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी लोकांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भारतासोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या आणि येथील समाजासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सर्व भारतीयांचे आभार.
भारत आणि डेन्मार्क यांच्यात दृढ संबंध
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, कोरोनामुळे जीवन व्हर्च्युअल मोडमध्ये चालले होते. आता ऑनलाईन वरून ऑफलाईन जावं लागणार आहे आणि खरं म्हणजे ऑफलाईन हीच खरी लाईफलाईन आहे. गेल्या वर्षी कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर पंतप्रधान फ्रेडरिक्सन या पहिल्या प्रमुख पाहुण्या होत्या, ज्यांचे भारतात स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली. आज झालेल्या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवे बळ मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय जगात कुठेही गेला तरी तो आपल्या कर्मभूमीसाठी आणि देशासाठी प्रामाणिकपणे योगदान देतो. अनेक वेळा जेव्हा मी जागतिक नेत्यांना भेटतो तेव्हा ते त्यांच्या देशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या कामगिरीबद्दल अभिमानाने सांगतात. यासाठी तुम्ही सर्व धन्यवादास पात्र आहात. मला मिळालेले अभिनंदन मी तुम्हाला समर्पित करतो.
भाषा वेगळ्या आहेत पण संस्कृती भारतीय: पंतप्रधान मोदी
भारतीय समुदायाची सांस्कृतिक विविधता ही अशी शक्ती आहे, जी आपल्याला प्रत्येक क्षणी जिवंत असण्याची जाणीव करून देते. भारतातील विविध राज्यातील लोक डेन्मार्कमध्ये आले आहेत. कोणी तेलुगु बोलतो, कोणी पंजाबी, कोणी बंगाली, तमिळ, मल्याळी, आसामी, कोणी मराठी तर कोणी गुजराती... भाषा कोणतीही असो, पण भावना एकच आहे. आपल्या सर्वांना भारतीय संस्कृती आहे. आपली जेवणाची थाळी बदलते, पण प्रेमाने विनवणी करण्याची भारतीय पद्धत कधीच बदलत नाही, असं यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.