Bacchu Kadu: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंची भाषा बदलली, मविआसोबत चर्चेसाठी तयार, बारामतीमधून विजय शिवतारेंना पाठिंबा
Nagpur News: बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आल्यास आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असे सांगितले. बच्चू कडू यांच्या या पवित्र्यामुळे महायुतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर: बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई जिंकण्यासाठी अजित पवार हे सध्या सर्व ताकद पणाला लावताना दिसत आहेत. कधी नव्हे ते अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विरोधकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांना मदत करण्याचा प्रस्ताव झिडकारुन लावत बारामतीमधून लोकसभा (Baramati Loksabha) निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि अजितदादा गटातील नेत्यांमध्ये वाकुयद्धही सुरु झाले आहे. या वादात आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी विजय शिवतारे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून लढले तर मी त्यांना पाठिंबा देईन, असे बच्चू कडू यांनी म्हटले. बच्चू कडूंच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपासंदर्भातही भाष्य केले. आमच्या पक्षाला सध्या महायुतीकडून जागावाटपाबाबत कोणतीही विचारणा झालेली नाही. आम्हाला विचारणा झालीच नाही तर आम्ही मी खासदार ही मोहीम राबवू. महायुतीतील पक्षांना आमच्यासोबत बोलण्याची गरज वाटत नसेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय, असे मला वाटते. महायुती पाळणे हे त्यांचे काम नसेल तर महायुती तोडणे आमचे काम आहे. भाजप जागावाटपात पुढाकार घेत असेल तर घटकपक्षांसोबत चर्चा करणे त्यांची जबाबदारी आहे. लहान पक्षांना सापत्न वागणूक देण्याचा भाजपचा इतिहास आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चेसाठी तयार: बच्चू कडू
राज्यात नवे सरकार स्थापन करण्यात आमच्या पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. भाजप पक्ष आम्ही स्थापन केलेल्या सरकारमध्ये सामील झाला आहे. आम्ही त्यांच्यात सामील झालेलो नाही. काही लोक 150 रुपयांची साडी घेऊन मतदान करतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपने जागावाटपाच्या चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही 10 पावलं पुढे टाकू. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. अन्यथा महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा केल्यास आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
आणखी वाचा