Hatkanangale : हातकणंगल्यात महायुतीकडून सरप्राईज उमेदवार? जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिंदेकडून नवी चाल, अपक्ष आमदाराच्या भावाच्या नावावर खल
Hatkanangale Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे धैर्यशिल माने हे खासदार असून त्यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याचं सांगितलं जातंय.
मुंबई: राज्यातील ज्या काही जागांवरून आणि उमेदवारावरून महायुतीत वाद सुरू आहे त्यापैकी एक जागा म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangale Lok Sabha Election). या मतदारसंघातून आता महायुतीकडून सरप्राईज उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिरोळमधील अपक्ष आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर (Sanjay Patil Yadravkar) यांच्या नावावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. हातकणंगल्यातील जातीय समीकरण लक्षात घेत संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर चर्चा झाली.
संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय पाटील यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याने आयत्या वेळी नव्या नावांवर चर्चा करण्यात आल्याची चर्चा आहे.
जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिंदेंची चाल?
हातकणंंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात नाराजी असल्याचं भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, तर एकनाथ शिंदे मात्र मानेंनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
त्यातच आता भाजपने हातकणंगले मतदारसंघावर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच भाजपकडून त्यांचे समर्थक आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचं नाव पुढे आणण्यात आलं आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांनी राजू शेट्टी यांना समर्थन देण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. राजू शेट्टी विरूद्ध विनय कोरे अशी लढत झाली तर या मतदारसंघातील चित्र बदलू शकतं.
या सगळ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे गट मात्र ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यामुळेच आता धैर्यशील माने यांच्या नावाला असलेला विरोध लक्षात घेता नवीन नावावर चर्चा केली जात आहे.
अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. हातकणंगल्यातील जातीय समीकरणं लक्षात घेता त्यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळेच त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकरांचं नाव आता पुढे येत आहे.
ही बातमी वाचा: