भाजपला मराठवाड्यात आणखी एक दे धक्का; माजी गृहराज्यमंत्र्यांकडून सोडचिठ्ठी, सर्वच पदांचा राजीनामा
गेल्या काही दिवसांपासून भाजपात काहीही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. भाजपने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीलाही सोबत घेतले.
नांदेड : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षांतील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खदखद बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता, नांदेडमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. किन्हाळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातो.दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने ते नाराज असल्याचे दिसून आले होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपात काहीही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. भाजपने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीलाही सोबत घेतले. त्यामुळे, भाजपमधील काही नेते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असते. आता, भाजपमधील नाराजी उघडपणे समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात झालेल्या दोन नेत्यांच्या राजानाम्यामुळे भाजपला मराठवाड्यात धक्का बसल्याचे स्पष्ट झालं आहे. सूर्यकांता पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर खासदार अशोक चव्हाणांवर टीका केली होती. त्यानंतर, आता माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माधव किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जवाबदारी होती. त्यामुळे, सूर्यकांता पाटील यांच्यानंतर हा भाजपसाठी दुसरा धक्का मानला जात आहे.
शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते मंत्री
डॉ. माधव किन्हाळकर यांनी 2014 मध्ये भोकर (विधानसभा मतदारसंघ) मधून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी, 53,224 मते मिळवून ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी 1991 ते 1999 या कालावधीत भोकर मतदारसंघाच्या विधानसभेचे काँग्रेस सदस्य म्हणून काम केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये 1991 ते 1995 या कालावधीत ते गृह व्यवहार, महसूल आणि सहकार राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते.
हेही वाचा
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात
Video: पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण...; शरद पवारांच्या नकारातही दिसला असा होकार