गणेश नाईकांची नाराजी दूर करणं महायुतीसाठी जिकरीचं, नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरुन भाजपच्या गोटात खदखद
Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वेळेस म्हस्के यांना जाहीर करण्यात आली, मात्र त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य बघायला मिळालं.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha Constituendy) भाजपला (BJP) जाणार या विश्वासात असलेले ठाण्यातील मोठे नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्या आनंदावर 2 दिवसांपूर्वी विरजण पडले. कारण सर्व तयारी झाली असताना ठाण्याची जागा स्वतःकडे ठेवण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आणि भाजपच्या संजीव नाईक यांच्या ऐवजी सेनेच्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांचे नाव जाहीर झाली. साहजिकच त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी पसरली आणि गुरुवारी संध्याकाळी नवी मुंबईत या नाराजीचा स्फोट झाला.
गणेश नाईक यांची नाराजी दूर?
गणेश नाईक यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. अखेर सर्वात शेवटी ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वेळेस म्हस्के यांना जाहीर करण्यात आली, मात्र त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य बघायला मिळालं. मात्र हे नाराजी नाट्य एका रात्रीत थंड करण्यात आलं. ठाण्याच्या जागेवरून कोण होते नाराज आणि शांत झाल्यावर काय प्रतिक्रिया मिळाली, हे जाणून घ्या.
नरेश म्हस्केंच्या उमेदवारीविरोधात नाराजीनाट्य एका रात्रीत थंडावलं
गणेश नाईक (Ganesh Naik) हे महाराष्ट्रातले मोठे नेते. आधी शिवसेना मग अनेक वर्षे राष्ट्रवादी त्यानंतर भाजपा मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेव्हापासून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव खासदारकीसाठी चर्चेत होते. गेल्या एक दीड वर्षापासून त्यांची नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर इथे तयारी देखील सुरू होती, ठाण्याच्या जागेसाठी भाजप आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रचंड आग्रही होते. पण संजीव नाईक यांना यावेळी तरी संधी मिळाली नाही. त्यामुळेच नवी मुंबईत नाराजी नाट्य बघायला मिळाले. मग ठाण्याची जागा निवडणूक कशी येणार असा प्रश्न निर्माण झाला.
नाराजी दूर करण्यासाठी नाईकांची भेट
नाईक परिवारातील नाराजी दूर करण्यासाठी गुरुवारी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक हे नेते त्यांच्या भेटीला गेले होते. मात्र त्यानंतर देखील नाराजी दूर झाली नसल्याने अखेर भाजपच्या पक्षश्रेठींनी नाईक यांना फोन वरून समजावले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाईक यांना तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं नाईक यांची नाराजी दूर झाल्याची माहिती पुढे आली. येत्या दोनच दिवसात गणेश नाईक यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
नरेश म्हस्केंनी भरला उमेदवारी अर्ज
याचेच पडसाद म्हणून शुक्रवारी नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश नाईक स्वतः उपस्थित होते. तर सोबत संजीव नाईक, संदीप नाईक आणि भाजप आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते. अर्ज भरून बाहेर पडताना गणेश नाईक यांनी मला कोणाचीही तंबी द्यायची हिंमत नाही, असे एबीपी माझाशी बोलताना सांगितले, तसेच नाराजी नव्हतीच असेही सांगितले.
गणेश नाईक यांच्या पाठिंब्याशिवाय ठाण्याची जागा जिंकणे, हे महायुतीसाठी कठीण जाईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील नाईक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यासाठी फोन वरून बातचीत केल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. अजूनही नवी मुंबईमध्ये नाईक कुटुंबीयांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांच्यावर कोणतेही आरोप झाले तरी मतदान त्यांच्याच बाजूने होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ठाण्याची जागा जिंकण्यासाठी नवी मुंबई काबीज करणे गरजेचे आहे. यावर मुख्यमंत्री यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली.
रॅलीमध्ये भाजप, सेना, राष्ट्रवादी एकत्र
आजतरी महायुतीच्या रॅलीमध्ये भाजप, सेना, राष्ट्रवादी एकत्र दिसून आले. मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मात्र नाईक कुटुंबीयांची ही नाराजी खरंच दूर झाली का? हा अजूनही प्रश्न आहे. जर नवी मुंबईतून नरेश म्हस्के यांना लीड मिळाले, तरच ठाण्याची जागा जिंकता येणार आहे, त्यामुळे गणेश नाईक यांची नाराजी मनापासून दूर होणे महायुतीसाठी निकरीचे बनले आहे.