राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या विरोधात, नाशिकची जागा सोडल्याने नाराजीचा सूर
Nashik Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती आहे. नाशिकची जागा सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातला एक गट अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. काही लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खमके उमेदवार असतानाही राष्ट्रवादी (NCP Ajit Pawar) महायुतीसाठी (Mahayuti) जागा सोडल्या, यामुळे पक्षातील एक गट अजित पवारांवर नाराज असल्याचं समोर येत आहे. महातयुतीत भाजपच्या दबाबमुळे राष्ट्रवादी पक्षातील एक गट नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादीत नाराजी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाशिकसह परभणी, गडचिरोली, सातारा या लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना देखील शिवसेना आणि भाजपच्या दबावाला झुगारता न आल्यामुळे निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्याने नाराजीचा सूर या कार्यकर्त्यांमध्ये उमटत असल्याचं समोर आलं आहे.
एक गट अजित पवारांवर नाराज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ स्वत:च्या पक्षातील दोन उमेदवार आणि इतर ठिकाणी उमेदवार आयात केल्याने आणि निवडून येणारे मतदार संघ सोडून इतर मतदारसंघ घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील एका गटाचं नाराजीचं वातावरण असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाशिक लोकसभेमुळे नाराजीत आणखी भर
नाशिक लोकसभेचा निर्णय तीन आठवडे घ्यायला विलंब लावल्याने या नाराजीत आणखी भर पडल्याची माहिती आहे. केंद्रीय पातळीवरून उमेदवारी जाहीर होऊन देखील राज्यातील नेत्यांच्या दबावाला झूगारता न आल्यामुळे नाशिकची निवडून येऊ शकेल, अशी जागा गमावल्याची भावना या नेत्यांमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातून लोकसभेला घड्याळ चिन्ह हद्दपार गेल्यानेही नाराजी दिसून येत आहे.