Eknath Shinde & Sanjay Dina Patil: एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची हजेरी, चर्चांना उधाण
Eknath Shinde & Sharad Pawar: एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे संजय राऊत नाराज झाले होते.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेतील ऐतिहासिक बंडाचे सेनापती एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्यावरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग रंगला आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले होते. यावरुन ठाकरे गटात तीव्र पडसाद उमटले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, 'शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला जायला नव्हते पाहिजे', असे सांगत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा वाद सुरु असतानाच आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यावेळी ठाकरे गटाचा एक खासदार त्याठिकाणी उपस्थित होता.
ईशान्य मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा 36 चा आकडा असूनही संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) या सोहळ्याला कसे उपस्थित राहिले, असा सवाल आता विचारला जात आहे. संजय दिना पाटील यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली. दरम्यान, संजय दिना पाटील यांनी आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण असल्यामुळे आपण तिकडे गेलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांची शरद पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळेच ते या कार्यक्रमाला गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शिंदे गटाकडून वारंवार 'ऑपरेशन टायगर' राबवण्याची भाषा सुरु आहे. कालच रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. ते आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अशातच आता संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात दिसून आल्याने कोणतीही शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, आदित्य ठाकरे हे सध्या दिल्लीत आहेत. ते आज दुपारी ठाकरे गटाच्या खासदारांची भेट घेणार आहेत. यावेळी संजय दिना पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा होणार का, हे बघावे लागले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रात्री राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. कोणालाही फारसा थांगपत्ता लागून न देता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट पार पडली. तब्बल पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या स्नेहभोजनला ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर हे तीन खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा
























