Coal Scam: ममता बॅनर्जींच्या भाच्याला पुन्हा ईडीचं समन्स; कोळसा घोटाळ्याची होणार चौकशी
Coal Scam: कोळसा घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.
Coal Scam: कोळसा घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करणार आहे. या दोघांना वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडी 21 मार्चला आधी अभिषेक बॅनर्जी यांची आणि त्यानंतर 22 मार्चला रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करणार.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी या दोघांना पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर (ED) हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. यापूर्वी मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी या दोघांना समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, आम्ही पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याने आम्हाला दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये, असे निर्देश ईडीला देण्यात यावे.
बॅनर्जी यांनी सर्व आरोप लावले फेटाळून
या प्रकरणी बॅनर्जी यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका तपास यंत्रणेच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. सीबीआय (central bureau of investigation) ने नोंदवलेल्या नोव्हेंबर 2020 च्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ज्यामध्ये आसनसोल आणि त्याच्या लगतच्या कुनुस्टोरिया आणि कजोरा भागातील इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणींशी संबंधित कोट्यवधींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर व्यवसायातून मिळालेल्या पैशाचे बॅनर्जी लाभार्थी असल्याचा दावा ईडीने केला होता. मात्र अभिषेक बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
UGC कडून चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम तर पीएचडी अभ्यासक्रमातही सुधारणा होणार
Coronavirus Cases Today : देशात कोरोना प्रादुर्भावात घट; गेल्या 24 तासांत 2539 दैनंदिन रुग्णांची नोंद