Dhananjay Munde : 1998 पासून मराठा आरक्षणाला पाठिंबा, पोलिसांनी शांतता रॅलीला परवानगी नाकारली नाही, धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितलं
Dhananjay Munde : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या शांतता रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई/ बीड : राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी मराठा समाजाच्या रॅलीला पोलिसांनी (Beed Police) परवानगी नाकारली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही जणांकडून पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं सांगून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. बीड जिल्ह्यात मराठा समाज (Maratha Community) बांधवांची शांतता रॅली अत्यंत शांततेत पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बीडमध्ये पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली गेली असल्याचा दावा केला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाजबांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे.
मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1998 सालापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडून समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलेला आहे.कृपया कोणीही अफवा पसरवून किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, ही विनंती असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांचं ट्विट
मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनाने…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 9, 2024
मनोज जरांगे काय म्हणाले होते?
हिंगोली, परभणी, नांदेडनंतर आता लातूरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅल पोहोचली आहे. लातूरमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी बीड मध्ये पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप केला होता. बीडमध्ये 11 जुलै रोजी शांतता रॅली होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांनी बीडचे पालकमंत्री असं म्हणत धनंजय मुंडे यांचा थेट उल्लेख टाळला होता.
बीडच्या पालकमंत्र्यांना असला जातीवाद शोभत नाही, आम्ही नाही कधी जातीवाद केला. 5-5 पिढ्या तिथल्या मराठ्यांनी तुम्हाला मोठं करायचं काम केलं, आम्ही जातीवादी नसून आमच्या लेकरांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले होते.
संबंधित बातम्या :