मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानाचं पान, नरेंद्र मोदी, अमित शाहांसोबत थेट पहिल्या पंक्तीत स्थान!
दिल्लीत पार पडलेल्या भाजपाशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानाचे स्थान देण्यात आले.
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्र भाजपाचे सर्वोच्च नेते आहेत. राज्यात त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम मानला जातो. लोकसभा निवडणुकीदरम्यान ते केंद्रात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान, भाजपाने देशातील भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मानाचं स्थान देण्यात आलं. बैठक मुख्यमंत्र्यांची होती. पण उपमुख्यमंत्री असूनही ते फोटोसेशनसाठी पहिल्या पक्तींत होते. याच फोटोची सध्या सगळीकडे चर्चा असून या बैठकीच्या रुपाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत मानाचं स्थान कायम असल्यांचं म्हटलं जातंय.
उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थिती
उपमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पहिल्या रांगेत पाहायला मिळाले. सध्या चर्चेत असलेल्या या फोटोत भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. पहिल्या पंक्तित नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दिसत आहेत. या पहिल्या पंक्तित देशातील महत्त्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. याच रांगेत उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलं आहे.
फडणवीसांना पहिल्या रांगेत मानाचं पान
पहिल्या रांगेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आहेत. शर्मा यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस आसनस्थ झालेले पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे 27 आणि 28 जुलै अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मुख्यमंत्री परिषदेला फक्त मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा होती. पण या बैठकीला देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. एवढंच नव्हे तर पार्टीचा प्रोटोकॅाल तोडून फडणवीस यांचं पहिल्या रांगेतलं स्थान कायम ठेवण्यात आलं. म्हणूनच या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
फडणवीसांनी सरकारमध्येच राहावे, केंद्रीय नेत्यांचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांनी बंड केल्यानंतर फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण अनपेक्षितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, अशी घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच मी सरकारमध्ये नसेल पण माझे लक्ष राहील, असेही तेव्हा फडणवीस म्हणाले होते. पण पुढच्या काही मिनिटांत केंद्रातील नेत्यांच्या आदेशानंतर फडणवीस यांनी सरकारमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. फडणवीसांचे महत्त्व तसेच ते उपमुख्यमंत्री असल्यास महाराष्ट्रातील सरकारला स्थिरता येईल, असा भाजपाच्या केंद्रीय नेत्यांचे मत होते.
पुन्हा एकदा सरकारमध्ये कायम राहण्याचा आदेश
लोकसभा निवडणुकीत भापजपाला महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली नाही. याची जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारबाहेर थांबवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला पूर्ण तकतीने प्रयत्न करायचे आहेत. मला जबाबदारीतून मुक्त करावे. तशी विनंती मी दिल्लीतील नेत्यांकडे करणार आहे, असे त्यावेळी फडणवीस म्हणाले होते. पण तेव्हादेखील भाजपाच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांनी फडणवीसांचे महत्त्व ओळखत त्यांना सरकारमध्ये कायम राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना पहिल्या पंक्तीत मानाचे स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा :
दोन पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा आमदार, घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
'एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे,' संजय राऊतांचा गौप्यस्फोट!