83 वर्षांच्या व्यक्तीनं कटपुतल्या सोडल्या, देवेंद्र फडणवीस टार्गेटवर; श्याम मानव, जरांगेंचं नाव घेत अनिल बोंडेंचा गंभीर आरोप
Anil Bonde on Sharad Pawar: भाजपमध्ये संस्कार आहेत, काही नेते बोलत नसणार पण आमच्यासारखे लोक इथे बोलायला आहेत, चिंता करू नका, असंही खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत.
Anil Bonde on Sharad Pawar: अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 83 वर्षाच्या व्यक्तीनं कट-कारस्थान करत अनेक कटपुतल्या सोडल्यात. श्याम मानव (Shyam Manav), मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सारखे लोक सोडले आहेत. त्यांचं एकच टार्गेट आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे ब्राह्मण आहेत. त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं हे कट कारस्थान सुरू असल्याचं अनिल बोंडे म्हणाले आहेत. अकोल्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आज मनोज जरांगे देवेंद्र फडवणीस यांना शिव्या देतात, वाटेल ते बोलत आहेत. भाजपमध्ये संस्कार आहेत, काही नेते बोलत नसणार पण आमच्यासारखे लोक इथे बोलायला आहेत, चिंता करू नका, असंही खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत. ज्या व्यक्तीनं मराठा आरक्षणासाठी सातत्यानं काम केलं. त्यांनाच शिव्या घालत आहेत. याचं वाईट वाटत असल्याची खंत अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.
आज सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, शरदचंद्र पवार यांच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय झाला आहे. साखर कारखान्यांसाठी ओरडले, मात्र विदर्भातल्या कापसावर बोलले का? असा सवालही खासदार अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार हे खूप हुशार आहेत, अशी माणसं राज्यात पेरतात. शाम मानव आणि अनिल देशमुखांना आता जाग येत आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस आठवतात. हे सर्व ठरवून आहे. सर्व स्क्रिप्ट बारामतीतून लिहिल्या जात आहेत. ते स्क्रिप्ट शरदचंद्र पवार यांच्या डोक्यातून, त्यांच्या मेंदूचा लोक नंतर अभ्यास करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातल्या जनसामान्यांना समजायला लागले, ते उत्तर देतील. आज अनेक व्यक्ती समोर येत आहेत. सुरुवातीला मनोज जरांगे फडणवीसांना खालच्या पातळीवर शिव्या दिल्या जातात, नंतर श्याम मानव आरोप करतात, आता अनिल देशमुख आले. देवेंद्र फडणवीस यांची इमेज खराब करण्याचं काम सुरू आहे, कारण तोच ताकदवान व्यक्ती आहे, शरद पवारांना टक्कर देऊ शकतो, म्हणून त्यांचं खच्चीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं अनिल बोंडे म्हणाले आहेत.