(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात फडणवीसांनी अन् जलसिंचन घोटाळ्यात मोदी वाचवतायत; शालिनी पाटील यांचा आरोप
Shalini Patil : पाच वर्षांपूर्वी गून्हा दाखल होऊन देखील कारवाई होत नाही. फडणवीस आणि मोदी हे अजित पवारांना वाचवत असल्याचा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना शिखर बँक घोटाळ्यातून (Shikhar Bank Scam) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाचवलं, तर जलसिंचन घोटाळ्यातून (Irrigation Scam) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी केला आहे. विशेष म्हणजे शालिनीताई पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहले आहेत. ज्यात, पूर्वीच्या जनसंघाने शिखर बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना शालिनीताई पाटील म्हणाल्यात की,"भारतीय जनता पक्षाचे मूळ नाव जनसंघ आहे. मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय हे नाव वापरायचा अधिकार कोणी दिला. महाराष्ट्रातील काही नेते माझं ऐकतात, त्यांना मी पत्र लिहून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी विनंती केली आहे. अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल. शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला. अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे. शरद पवार ठरवतील त्यांना कधी रिटायर व्हायचा आहे. उद्या मला देखील मी 92 वर्षाची असल्याने वेडं ठरवतील," असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
मला महिन्याला चार पेन्शन्स मिळतात...
पुढे बोलतांना त्या म्हणाल्यात की, "अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो याची चौकशी लावली. अँटी करप्शनचे अधिकारी याची चौकशी करत होते. त्यांना सांगायचे आहे, मला महिन्याला चार पेन्शन्स मिळतात. यातूनच मी कोर्टातील लढाई लढण्यासाठी खर्च करत असते. मागील पंधरा वर्षात तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मी माझा कारखाना सभासदांच्या हातात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही," असे त्या म्हणाल्या.
एकनाथ शिंदे मला भेटण्याची वेळ देत नाही...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते साताऱ्याचे आहेत. मी अनेक वेळा पत्र लिहून भेटण्यासाठी वेळ मागितला. मात्र त्यांनी कधीही मला वेळ दिला नाही. महाराष्ट्रातला आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकही मुख्यमंत्री माझ्याशी असं वागला नाही. बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये असताना मी त्यांच्याकडे अपॉइंटमेंट न घेता गेले. मात्र, त्यांनी माझा प्रश्न पाच दिवसात सोडवला. मला बारा कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे यांना मिळवून दिले होते. त्यांच्याच पक्षाचे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते माझ्याशी ज्या प्रकारे वागत आहेत हे अतिशय चुकीचं आहे. आता यांना मी कधीही भेटणार नाही, असेही शालिनीताई पाटील म्हणाल्या.
अजित पवार, फडणवीसांसह मोदींवर गंभीर आरोप...
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात शालिनीताई पाटील यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. ज्यात त्यांनी म्हटले आहे की,” पाच वर्षांपूर्वी गून्हा दाखल होऊन देखील कारवाई होतं नाही. जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. तो घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी झाकून टाकला. तर, शिखर बँकेतील 25 हजार कोटींचा घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना भाजपसोबत घेऊन झाकल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: