Devendra Fadnavis: लोकसभेच्या चुका विधानसभेला नको, सर्वस्व झोकून काम करा; देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना
Maharashtra Politics: पराभवाने खचून जाऊ नका, नव्या ताकदीने कामाला लागा, देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांचा उत्साह वाढवला. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवेंसह पराभूत उमेदवारांसोबत स्नेहभोजन.
मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीचे संघटनेकडून गांभीर्याने मूल्यमापन केले जात आहे. अशातच बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप (BJP) उमेदवारांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी या पराभूत उमेदवारांशी चर्चा करुन त्यांना नव्या ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यापैकी फक्त 9 उमेदवार निवडून आले होते. 2019 च्या तुलनेत भाजपच्या खासदारांची संख्या 23 वरुन 9 पर्यंत खाली घसरली होती. या निराशाजनक कामगिरीनंतर महाराष्ट्र भाजपकडून पराभवाच्या कारणांचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजपच्या पराभूत उमेदवारांशी संवाद साधून अपयशयाची कारणे जाणून घेतली.
विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांचा कानमंत्र
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या लोकसभेतील पराभूत उमेदवारांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचा कानमंत्र दिली. पराभवाने खचून न जाता आता विधानसभेसाठी सर्वांनी ताकदीने कामाला लागू. विधानसभेसाठी सर्वांनी स्वतःला झोकून देऊन काम करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना केली.
लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभेत होणार नाहीत, यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच कालच्या बैठकीत फडणवीस यांनी संघटनात्मक बाबींवर देखील चर्चा केली. चर्चा संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पराभूत उमेदवारांसोबत स्नेहभोजनही केले. या बैठकीला रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
आजपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वतंत्र पत्रकारपरिषदा घेऊन परस्परांवर जोरदार टीका केली होती. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात कामकाजाचे एकूण 11 दिवस आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्यास अधिवेशनात प्रत्यक्षात किती दिवस कामकाज होणार, हे बघावे लागेल. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ या बड्या नेत्यांच्या भाषणाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा