Devendra Fadnavis: मुंबईत ठाकरे गटाला मराठी माणसाने मतं दिली नाहीत, एका विशिष्ट समाजाच्या ताकदीवर ते निवडून आले: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंना सहानुभूती मुंबई आणि कोकणात असती तर ती दिसायला पाहिजे होती, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई: आपली प्रत्यक्ष मते ही वाढलेली आहेत. राज्यातले उद्योग पळवले असा नरेटीव्ह पसरवला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या काळात महाराष्ट्रात खाली होता. रोज खोटं बोलत होते की, उद्योग पळवले, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबईत भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधत लोकसभेच्या निकालाचं गणित समजावून सांगितलं.
उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती, मग कोकणात का दिसली नाही?, कोकणात उबाठाला एकही जागा नाही. पालघर, रत्नागिरी, ठाण्यात एकही जागा नाही. मुंबईत देखील यांना मराठी माणसांनी मतदान केलं नाही. मुंबईत यांना कुणामुळे जागा मिळाल्या, हे तु्म्हाला माहिती आहे. केवळ एका विशिष्ठ मताच्या आधारावर हे जिंकले. आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात देखील त्यांना जास्त लीड घेता आले नाही. कोकणात उबाठाला लोकांनी हद्दपार केले आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. दरम्यान, मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. तर 2 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.
वरळीत फक्त 6000 मतांचं लीड-
उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे, असा नरेटिव्ह तयार केला. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मुंबई आणि कोकणात असती तर दिसायला पाहिजे होती. ठाण्यापासून कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा आली नाही. कोकणात नाही, पालघर नाही, ठाणे जिल्ह्यात नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड या भागात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही. मुंबईत मराठी माणसाने मते दिले नाही. मराठी माणसाने व्होट दिलं असतं तर दक्षिण मुंबईत वरळीत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फक्त 6000 मतांचा लीड आहे. शिवडीत 35 -40 हजार लीड मिळाले असते. विक्रोळी भांडूप ईशान्य मुंबईत मध्ये 60 हजार लीड मिळाला असता, पण ते मिळालं नाही. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातून उद्योग पळवले हा नरेटिव्ह खोटा: देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीकडून सातत्याने महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असा नरेटिव्ह सातत्याने मांडण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीत खाली होता, गुजरात, कर्नाटक ही दोन राज्यं पुढे होती. यावर्षी अशी परिस्थिती अशी आहे की, गुजरात, कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तर त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. आता गुजरात आमच्याशी स्पर्धा करु शकत नाही. असं असताना रोज खोटं नरेटिव्ह, उद्योग पळवले बोलायचे. उद्योग पळाले असते तर एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात कशी आली असती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8