फडणवीसांकडून फेक नरेटिव्हचा आरोप, उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर; शरद पवारांनी करुन दिली म्हशीची आठवण
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आमची लढाई 4 पक्षांविरुद्ध होती. चौथा पक्ष म्हणजे फेक नेरेटीव्ह होय
मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. तर, महायुतीच्या (Mahayuti) पक्षांची चांगलीच पिछेहाट झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आणि सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे आभार मानले. ही लढाई विचित्र होती, पण संविधान वाचवण्यासाठी होती. मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो व भगिनींनी अशी करायचो, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी, भाजपकडून करण्यात आलेल्या फेक नेरेटीव्हच्या आरोपावरही चोख प्रत्युत्तर दिले.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आमची लढाई 4 पक्षांविरुद्ध होती. चौथा पक्ष म्हणजे फेक नेरेटीव्ह होय. चुकीचं कथानक तयार करुन प्रचार केला, संविधान बदणार आहेत, असा खोटा प्रचार निवडणूक काळात करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. यासंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्त्युत्तर दिलं.
यांना मतं दिली तर हे तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, मंगळसुत्र उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे काय खरं नेरेटीव्ह होतं का, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. त्याचवेळी, बाजूला असलेल्या शरद पवारांनी म्हशीची आठवण करुन दिली. तुमची म्हैश चोरुन नेतील, हे काय खरं नेरेटीव्ह होतं का, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या आरोपावर जशास तसे प्रत्युत्तर दिले. नकली सेना, नकली संतान, प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घरे देईन, उद्योगधंदे येतील, हे खरं नेरेटीव्ह होतं का, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
मोदी खाल्ल्या मिठाला जागतात का?
व्होट जिहाद म्हणजे काय, स्वत: पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं की, त्याचं बालपण मुस्लीम कुटुंबीयांच्या सानिध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता, खाल्ल्या मिठाला ते जागले आहेत का नाहीत. मोदींनी अगोदर सांगावे की, ते लहानपणीच्या खाल्ल्या मिठाला जागणार आहेत की नाहीत हे त्यांनी सांगावे. त्यामुळे, व्होच जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्रच लढणार
येत्या 2-3 महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आहेत. मोदी सरकार आता एनडीए सरकार झालंय. त्यामुळे, दिल्लीचं हे सरकार किती दिवस चालेल, हे माहिती नाही. मात्र, देशाची जनता या निवडणुकींच्या निमित्ताने जागी झालीय, हे या निवडणुकीचं मोठं यश असल्याचे मी मानतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आमची प्राथमिक बैठक झाली असून येणारी विधानसभादेखील आम्ही सामाजिक संघटना व घटकपक्षांना सोबत घेऊनच लढणार आहोत, असे म्हणत एकप्रकारे विधानसभा निवडणुकी एकत्रच लढणार असल्याची घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. पक्ष आणि चिन्ह यासंदर्भातील निकालाला आम्ही कोर्टात आव्हान दिलंय. पुढील महिनाभरात त्याचा निकाल येईल, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा