Congress President Election : निवडणूक काँग्रेस अध्यक्षपदाची, लढाई राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे त्यासाठी अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आहे. पण अध्यक्षपदासाठी गेलोत यांना पुढे केलं तर राजस्थानातला एक पेचप्रसंगही काँग्रेसला सोडवावा लागणार आहे.
Congress President Election : एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) लढाई आणि दुसरीकडे राजस्थानातल्या अंतर्गत संघर्षाला उधाण... काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्या अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचं नाव समोर येतंय, ते राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडणार का हा सवालही त्यामुळे सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत चालली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल अशोक गहलोत यांनी राजस्थानात आमदारांची एक बैठक आयोजित केली होती.
एकतर अशोक गहलोत स्वत:हून काँग्रेस अध्यक्षपदासाठी फारसे उत्सुक नाहीत. पण गांधी कुटुंबाच्या आग्रहाने त्यांनाच उभं राहावं लागलं तर राजस्थानचं मुख्यमंत्रीपदही आपल्याच ताब्यात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दिल्लीत जाण्यामुळे राजस्थानात जी राजकीय पोकळी निर्माण होईल ती सचिन पायलट यांना न सोडण्याची त्यांची धडपड आहे. अध्यक्षपद स्वीकारावं लागलं तरी पुढचे काही काळ मग मुख्यमंत्रीपदही आपल्याजवळच ठेवावं, किंवा जर सोडायची आली तर आपल्याच माणसाची तिथं वर्णी लागावी अशी खेळी ते खेळत आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय जवळ आलेला असताना आज दिल्लीत गेहलोतांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. खरंतर शेवटच्या क्षणापर्यंत राहुल गांधी यांनाच विनवण्यात ते आपली शक्ती खर्च करत आहेत. पण यावेळी गांधी कुटुंबीय यावेळी निवडणूक न लढण्यावर ठाम आहेत.
निवडणूक काँग्रेस अध्यक्षपदाची, लढाई राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची
- राजस्थानमध्ये 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट होते
- पण सत्ता मिळाल्यानंतर अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याने मुख्यमंत्रीपद अशोक गेहलोत यांना मिळालं
- त्याआधी अशोक गेहलोत संघटना महासचिव पद सांभाळायला दिल्लीत होते
- थोड्याच काळात ते पुन्हा राजस्थानात परतले..
- आताही अध्यक्षपदासाठी त्यांची चर्चा असताना गेहलोतांचं लक्ष राजस्थानातील खुर्चीकडेच अधिक आहे
- मागच्यावेळी मध्य प्रदेशात कमलनाथ आणि राजस्थानात अशोक गहलोत यांना संधी देताना ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट यांना थांबावं लागलं होतं.
- त्यापैकी ज्योतिरादित्य हे तर सध्या भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झालेत
- आता पुढच्या वर्षभरात राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांचं पक्ष काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न
अध्यक्षपदाच्या चर्चा सुरु असताना काल राजस्थानमध्ये गेहलोतांनी आमदारांची बैठक घेतली. काळजी करु नका मी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही, असं त्यांनी आपल्या समर्थकांना सांगत आश्वासित केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याची वेळ आली तरी राजस्थानवरची आपली पकड गहलोत ढिली होऊ देणार नाहीत हे उघड आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आली तर विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष सीपी जोशी यांना मुख्यमंत्री करावं या मताचे गेहलोत आहेत. आता सगळी धामधूम अध्यक्षपदासाठी सुरु असताना राजस्थानातल्या या अंतर्गत संघर्षाचं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
संबंधित बातम्या