विजयी मेळाव्याला जाणे न जाणे हा दुय्यम मुद्दा,पण..; ठाकरे बंधुंच्या आमंत्रणाच्या प्रश्नावर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली बगल, म्हणाले..
Congress: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना तशा स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एबीपी माझाशी बोलताना केलंय.

Congress On Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजय मेळाव्याला जाणे न जाणे हा दुय्यम मुद्दा आहे. मात्र मराठीच्या मुद्द्यावर आम्ही दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे यात सर्वांचाच विजय झालेला आहे. भारतीय जनता पार्टी ही मराठी आणि महाराष्ट्र धर्म संपवायला निघालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतलेली नव्हती , मात्र सरकारला हिंदी भाषेचे जीआर रद्द करण्याला आम्ही जे भाग पाडलं त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, संघटना सामील झाल्या होत्या. त्यामुळे हे सर्वांचं यश आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तशा स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एबीपी माझाशी बोलताना केलंय.
काँग्रेसमध्ये ऐनवेळी नाराजी?
त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचे बघालया मिळाले. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे नव्यानं एकत्र आल्याने हा मिलाप नव्या राजकीय वाटचालीची नांदी असल्याचेही बोललं जात आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या कडाडून विरोधानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) हा निर्णय मागे घेतला. हिंदी सक्तीविरोधातील (Hindi Compulsory) निर्णय शासनाने मागे घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून 5 जुलै रोजी 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा वरळी येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, महाविकस आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला अद्याप या विजयी मेळाव्याचे आमंत्रण मिळालेलं नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील ऐनवेळी नाराजी पसरल्याची माहिती समोर आली आहे.
मराठीची लढाई ही आता अंशतः जिंकली आहे. प्रसंगी हा जो विजय आहे हा एक मोठ्या कटकारस्थानाच्या विरोधात आहे. संघाच्या कुशीत जन्माला आलेली भारतीय जनता पार्टीचा मूळ मुद्दा अजेंडा भारतीय संविधान संपवणे हा आहे. प्रांत वार आणि भाषावारजी रचना झालेली आहे ती भाजपला अमान्य आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म त्यांना संपवायचा आहे. हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र अशी मांडणी करताना त्यांना मराठी आडवी येत आहे. त्यामुळे ते मराठीला संपवायला निघाले आहेत. सरकारला हिंदी भाषेचे जीआर रद्द करण्याला आम्ही जे भाग पाडलं त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, संघटना सामील होते. त्यामुळे हे सर्वांचं यश आहे. मात्र मोर्चामध्ये जायचं किंवा नाही जायचं हे ठरण्याआधीच आम्हाला माहिती होतं की हा मोर्चा निघणार नाही. त्याआधीच सरकारने जीआर रद्द केला. तर मोर्चात जाणे न जाणे हा मुद्दा दुय्यम आहे. ठाकरे बंधूंची भूमिका मित्रपक्ष म्हणून आमच्याशी मिळती जुळती होती. महाविकास आघाडीचा एकंदरीत मुद्दा म्हणून या मुद्द्याकडे बघता येईल. असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























