Vasant More: मविआच्या पाठिंब्यासाठी तात्यांनी पुण्यात फिल्डिंग लावली, पण काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना, आता वसंत मोरे काय करणार?
Vasant More: वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर मविआ पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
पुणे: काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या वसंत मोरे यांच्यासमोर आता पेच उभा राहिला आहे. काँग्रेसने गुरुवारी महाराष्ट्रातील 7 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुण्यातून काँग्रेसचा हुकमी एक्का असलेले कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकसभेच्या रिंगणातून उतरवण्यात आले आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवत नसल्याच्या मुद्यावरुन पक्ष सोडला होता. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा (Pune Loksabha) निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी वसंत मोरे यांनी काँग्रेससह मविआ आघाडीतील अन्य नेत्यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी पुण्यात वेगळा प्रयोग होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. परंतु, काँग्रेस पक्षाने गुरुवारी पुणे लोकसभेसाठी रविंद्र धंगेकर यांचे नाव जाहीर केल्याने वसंत मोरे यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे काय भूमिका घेतात, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
वसंत मोरे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच का?
गेल्या काही दिवसांमध्ये वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी मविआकडून पाठिंबा मिळवण्याचे बरेच प्रयत्न केले. पण मविआच्या नेत्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यापलीकडे फार काही केले नाही. त्यामुळे मविआ वसंत मोरे यांना लोकसभेत पाठिंबा देणार नाही, हे जवळपास स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी नुकतेच आपण पुण्याची लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच, असे सांगितले होते.
अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आणि सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू. पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील, मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे. मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते, असे वसंत मोरे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
रविंद्र धंगेकर पुण्यातून लोकसभेच्या मैदानात, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर