भाजप 'दक्षिण मे साफ, उत्तर मे हाफ', सहाव्या टप्प्यातच इंडिया आघाडीने 272 चा आकडा गाठला; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
Lok Sabha Elections : नरेंद्र मोदींना पराभव समोर दिसत असल्याने त्यांचा भ्रमनिराश झाला आहे, त्यामुळे मोदींनी आता निवृत्तीचे नियोजन करावं असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लगावला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान पार पडलं आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षाकडून मोठा दावा करण्यात आला. भाजपचा पराभव जवळपास निश्चित असून सहाव्या टप्प्यातच विरोधी इंडिया आघाडीने बहुमतासाठी लागणारा 272 जागांचा आकडा गाठला आहे असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी म्हटलं आहे. 'दक्षिण मे साफ, उत्तर मे हाफ' या घोषणेची पुनरावृत्तीही त्यांनी केली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सहाव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता दिल्लीत मतदान झाल्यानंतर भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. इंडिया आघाडीने आधीच 272 जागांचा टप्पा ओलांडला आहे आणि एकूण 350 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
भाजपच्या उमेदवारांविरोधात शेतकऱ्यांचा निषेध
काँग्रेस नेते जयराम रमेश पुढे म्हणाले की, हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये भाजपला प्रचार करण्यात अडचणी येत आहेत. कारण स्थानिक ग्रामस्थांकडून त्यांच्या नेत्यांना हाकलून दिले जात आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजप नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
इंडिया आघाडी 350 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या दिशेने
यावेळी जयराम रमेश म्हणाले की, भाजपचा निवडणूक प्रचार लवकरच संपत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी बराच वेळ आहे.
यासोबतच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दैवी शक्तीबाबतचे वक्तव्य गोंधळात टाकणारे असल्याचे म्हटलं आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले होते की, जोपर्यंत माझी आई जिवंत होती, तोपर्यंत मला असे वाटत होते की मी जैविकदृष्ट्या जन्मलो आहे. तिच्या निधनानंतर, जेव्हा मी माझे अनुभव पाहतो तेव्हा मला खात्री पटली की मला देवाने पाठवले आहे. ही ताकद माझ्या शरीरातून नाही, तर देवाने मला हे वरदान दिले आहे.
जयराम रमेश पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना पराभवाचे सत्य कळत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे. आता त्यांनी जाहीर केले आहे की त्याचा जन्म जैविक नव्हता आणि त्यांना देवानेच पाठवलं आहे. कदाचित त्यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत स्वतःला देव म्हणून पाहायचे असेल.
ही बातमी वाचा: