Tanaji Sawant: राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेलं वक्तव्य तानाजी सावंतांना भोवणार; मुख्यमंत्र्यांनी भेटीचा निरोप धाडला, कान टोचणार का?
Tanaji Sawant: राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेलं वक्तव्य तानाजी सावंतांना भोवणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावलं आहे.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केलेल्या महायुतीतील पक्षांनी आम्ही सर्वजण सोबत आहोत, एकमेकांना घेऊन पुढे जाणार आहोत असं सांगितलं असलं तरी युतीतील पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याचं चित्र काल दिसून आलं, शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याबाबतची वक्तव्य केली या सर्व घडामोडी घडत असतानाच आता तानाजी सावंत (Tanaji sawant) यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे.
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) भेटीसाठी बोलावलं असून तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत बोलावल्याची माहिती समोर आली आहे. भेटीसाठी बोलावलेल्या तानाजी सावंताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कान टोचवणार का? अशी चर्चा आता समोर आली आहे. तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीतून बाहेर पडण्याबाबत अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी वक्तव्ये केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या भेटीत केलेल्या वक्तव्याबाबत शिंदे सावंतांचे (Tanaji sawant) कान टोचणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणालेत तानाजी सावंत?
आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.
तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत.
तानाजी सावंत यांच्या या व्हायरल क्लिपवरती उमेश पाटलांची प्रतिक्रिया
तानाजी सावंत (Tanaji Sawant) जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये असंही पाटील यांनी पुढं म्हटलं आहे.