मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाराज विनोद पाटील भूमिका बदलणार? खैरेंच्या विरोधात संदीपान भुमरेंना पाठिंबा देणार का?
Chhatrapati Sambhaji Nagar : विनोद पाटील हे महायुतीकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती.
छत्रपती संभाजीनगर : संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या विनोद पाटलांची (Vinod Patil) भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली. महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आपण कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचं विनोद पाटलांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील हे शिंदेंचे उमेदवार असलेल्या संदीपान भुमरे यांना पाठिंबा देणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कुणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका
विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र या ठिकाणी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर विनोद पाटलांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र विनोद पाटलांनी महायुती किंवा मविआला पाठिंबा देणार नसल्याच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
जरांगेंच्या आंदोलनाचा फटका न बसण्यासाठी महायुती सावध
विनोद पाटील हे मराठा आरक्षण याचिकाकर्ते असून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी गेली अनेक वर्षे ते प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगेनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं, पण ते न्यायालयात कितपत टिकेल असा प्रश्न विचारला जात आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली असताना राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण दिलं. त्यामुळे राज्य सरकारने आपली फसगत केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे मराठवाड्यात महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू नये याची काळजी घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण आता शिंदेंकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दोन आमदार आणि एका खासदाराने विरोध केला
छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं होतं, मात्र शहरातील दोन आमदार आणि एका खासदाराने टोकाचा विरोध केला. निवडणूकीला उभा राहिलो असतो तर निवडून आलो असतो असं वक्तव्य करत विनोद पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
आपली उमेदवारी मागे घेताना विनोद पाटलांनी आपण महायुती वा महाविकास आघाडी, या दोघांनाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली. विनोद पाटलांच्या भूमिकेचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे. त्याचमुळे एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटलांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: