(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिन्ही सेना दलाचे प्रमुख उद्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार, 'अग्निपथ योजने'बद्दल देणार सविस्तर माहिती
Agneepath Scheme Row: केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी लागू केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातील तरुणाईचा विरोध आहे.
Agneepath Scheme Row: केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी लागू केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातील तरुणाईचा विरोध आहे. दरम्यान, मंगळवारी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्रपणे भेट घेणार असून त्यांना अग्निपथ भरती योजनेची माहिती देणार आहेत. सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, लष्करप्रमुख उद्या स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि त्यांना अग्निपथ योजनेबद्दल माहिती देतील.
अग्निपथ योजना गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आली आहे. देशभरात होतं असलेल्या विरोधानंतर केंद्र सरकार गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र दलातील नवीन भरती योजनेबद्दलच्या भीती दूर करण्यासाठी अनेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. 14 जून रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत अग्निपथ योजनेचे अनावरण करताना सांगितले की, हा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. जो सशस्त्र दलांना युवा प्रोफाइल प्रदान करेल.
केंद्रीय मंत्रिमंडळानेही 14 जून रोजी या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाईल. या योजनेचे फायदे सांगताना केंद्र सरकारने सांगितले की, ही सशस्त्र दलांच्या भरती धोरणातील एक परिवर्तनीय सुधारणा आहे. तरुणांना देशाची सेवा करण्याची आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी आहे. ही योजना देशभक्त आणि प्रेरित तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सेवा करण्याची परवानगी देते. सरकारने सांगितले की, ही योजना एक आकर्षक आर्थिक पॅकेज देते. सशस्त्र दलांना अधिक तरुण प्रोफाइल प्रदान करेल. तसेच अग्निवीरांना सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याची आणि त्यांची कौशल्ये आणि पात्रता वाढवण्याची संधी देईल.
दरम्यान, अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील देण्यात आला आहे. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स त्यांच्या स्वतःच्या अधिसूचना जारी करतील. ऑनलाइन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in वर जावे लागेल.