(Source: ECI | ABP NEWS)
Ajit Pawar: शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar in Satara: अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी प्रीतिसंगमावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील धार्मिक आणि जातीय सलोखा राखण्याचे आव्हान केले.

सातारा: गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे मंत्री नितेश राणे हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमकपणे बोलत आहेत. त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात जातीय सलोखा ठेवण्याची गरज व्यक्त केली. अलीकडे दोन्ही बाजूची लोकं काहीतरी बोलत असतात. ही वक्तव्यं अनेकदा महाराष्ट्राला सहन होणार नसतात. त्यामुळे अशी वक्तव्यं करणाऱ्यांना भान ठेवले पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी बुधवारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Birth Anniversary) यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त प्रीतिसंगम या समाधीस्थळाला भेट दिली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी आपण राजकारणात असेपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची कास सोडणार नसल्याचे सांगितले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन करताना कधीच जातींमध्ये किंवा समाजात भेद केला नाही. त्यांनी महाराष्ट्रात राहणारा जो मराठा माणूस आहे, त्या सगळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापन केली आहे. अलीकडच्या काळात 'छावा' चित्रपट आला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास नव्या पिढीसमोर आणला आहे.
मी विधिमंडळातील दोन्ही बाजूच्या सन्मानयीय सदस्यांना सांगेन की, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, असा मुस्लीम समाज मोठ्याप्रमाणावर भारतात आहे. आपण जो इतिहास वाचला आहे, तो संशोधन करुन आणि माहिती गोळा करुन मांडण्यात आला आहे. त्यामध्ये लिहण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मुस्लीम लोक होते. शिवाजी महाराजांचा दारुगोळा कोण सांभाळत होतं? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे अजित पवार यांनी म्हटले.
अर्थसंकल्पातील निधीवाटपावर कोणीही नाराजी नाही: अजित पवार
राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात प्रत्येक खात्याच्या वाट्याला आलेल्या निधीवरुन महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. याबद्दल अजित पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. बजेट हा कॅबिनेटची मंजुरी घेऊनच मांडला जातो. अर्थसंकल्प सादर करताना मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सगळ्या बाबी विचारात घेतल्या होत्या. त्यामुळे निधीवाटपावरुन कोणीही नाराजी नाही. समतोल विकास आणि गरीब समाजाला कशाप्रकारे न्याय मिळेल, हे बघून बजेट ठरवले जाते, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
























