Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर आज ते शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Chadrashekhar Bawankule : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर छगन भुजबळ हे आज शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार आणि छगन भुजबळ भेटत आहे. महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहे. त्याला अनुसरून ही भेट असू शकते. आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती हे स्पष्ट करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
भुजबळ कुठलाही निर्णय घेतील, असे वाटत नाही
भुजबळ हे महायुतीचे मोठे नेते आहेत. महायुतीला नुकसान होईल असे कोणतेही पाऊल ते उचलणार नाही. शरद पवार यांना भेटणे यात काहीही गैर नाही. आम्हीही अनेक वेळेला त्यांना भेटतो. भुजबळ कुठलाही निर्णय घेतील, असे मला वाटत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच, महायुती विधानपरिषद निवडणुकीत एकत्रित राहिली म्हणून मोठा विजय मिळाला आहे. भविष्यातही आम्ही एकत्रित राहू आणि विजय मिळवू. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद करतील. जनतेला डबल इंजिन सरकार हवंय, असेही त्यांनी सांगितले.
छगन भुजबळांचा शरद पवारांवर आरोप
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन कालच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर छगन भुजबळांनी गंभीर आरोप केले होते. छगन भुजबळ यांनी म्हटले होते की, राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा आरोप त्यांनी केली होती.
भुजबळ-पवार भेटीवर अजितदादा गटाची प्रतिक्रिया
छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले याबाबत अजित पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. शरद पवार(Sharad Pawar) देखील राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ यांना विचारून जाण्याची आवश्कता नाही. राज्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे नेते भेटायला जातात. ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याआधी आम्ही निर्णय घेण्याआधी त्याची कल्पना शरद पवारांना होती, असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या