Chandrapur News मोठी बातमी: चंद्रपूरमधील सीमावर्ती भागातील 14 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
Chandrapur News: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमाभागातील 14 गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Chandrapur News चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत लवकरच अधिक निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमाभागातील 14 गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. राजुरा आणि जिवती येथील प्रलंबित समस्यांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी तत्काळ आदेश दिले. विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात काल झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीला आमदार देवराज भोंगळे आणि जिवती तालुक्यातील 14 गावातील ग्रामस्थ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.
14 गावं कोणती?
मुकादमगुडा, कोठा, परमडोली, लेंडीगुडा, शंकरलोधी, पद्मापती, अंतापूर, येसापूर, भोलापठार, महाराजगुडा, इंदिरानगर, पळसगुडा, लेंडीझळा आणि इतर काही गावं अशी ही वादग्रस्त यादी. या गावांना एकसंध ओळख नाही – कधी महाराष्ट्राच्या योजनेचा लाभ घेतला जातो, तर कधी तेलंगणाच्या सुविधांवर अवलंबून राहावं लागतं.
नेमकं काय आहे प्रकरण?
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या 14 गावांचा सीमा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, पळसगुडा या सारखी 8 महसुली आणि 6 गुडे-पाडे यांचा समावेश आहे. 90 च्या दशकात तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने जिवती तालुक्यातील 14 गावांवर आपला हक्क सांगितल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र 1997 साली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्वाळा महाराष्ट्राच्या बाजूने दिल्यानंतर देखील आजपर्यंत ही गावे पूर्णतः महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होऊ शकलेली नाही. या गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये व कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. मुख्य म्हणजे 1997 नंतर तत्कालीन आंधरप्रदेश आणि आत्ता च्या तेलंगणा सरकारने या भागातील लोकांची मनं वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि कामांचा धडाका लावलाय. त्या मुळे इथल्या लोकांमध्ये तेलंगणा बद्दल आकर्षण निर्माण झालंय. या भागात बहुसंख्य असलेल्या बंजारा लोकांना तेलंगणा राज्यात अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळत असल्याने त्यांचा ओढा तेलंगणा कडे आहे. तर बंजारा समाजव्यतिरिक्त असलेला समाज महाराष्ट्रात राहण्याच्या बाजूने आहे. या भागातील 14 गावं विभासभेला महाराष्ट्रात राजुरा मतदारसंघात तर तेलंगनाच्या आसिफाबाद मतदारसंघासाठी मतदान करतात. लोकसभेसाठी चंद्रपूर आणि आदिलाबाद या मतदारसंघासाठी मतदान करतात. मात्र हा प्रश्न देखील सोडविला जावा अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
ग्रामस्थांची नेमकी मागणी काय?
आमच्या गावांची सीमा स्पष्ट करा आणि भूमी अभिलेख तयार करा, अशी या गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेताना नागरिकांना पत्ता पुरावा देणंही या ग्रामस्थांना कठीण जातं. आम्ही वर्षानुवर्षे एकाच प्रश्नावर जगतोय, असं ग्रामस्थांनी सांगितलं.

























