BMC Election 2026: राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले आहेत. मुंबईत मनसे-ठाकरेंच्या गोटात पहिली बंडखोरी झाली आहे.

BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भांडूपमधील माजी नगरसेविका अनिशा माजगावकर (Anisha Majgaonkar) या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाच्या पवित्र्यात आहेत. अनिशा माजगावकर यांनी भांडूप विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी मागितली होती. मात्र, जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याने अनिशा माजगावकर नाराज झाल्या आहेत. त्या बंडखोरी करुन उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरतील, असे सांगितले जात आहे.
भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावर हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी येथून आग्रही होते. तर माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांना हा वॅार्ड सोडण्यात यावा, यासाठी मनसे अडून बसली होती. अनिशा माजगावकर 2012 मध्ये इथून नगरसेविका झाल्या होत्या, तर 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी अनिशा माजगावकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 114 कोणाला सुटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर जागावाटपात वॉर्ड क्रमांक 114 ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने अनिशा माजगावकर यांचा पत्ता कट झाला होता. परंतु, वॉर्ड क्रमांक 114 मधून ठाकरे गटाचे खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अनिशा माजगावकर यांना शिवतीर्थवर बोलावून घेतले होते. याठिकाणी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा फारसा फायदा झालेला नाही. परिणामी अनिशा माजगावकर यांच्याकडून उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे.
BMC Election 2026: ठाकरे गटातही बंडखोरीची पहिली ठिणगी, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील शाखाप्रमुखाचा राजीनामा
मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मनसे आणि ठाकरे गट दोन्ही पक्षांनी दावा ठोकला होता. त्यामुळे जागावाटपात प्रभाग निश्चित झाल्यानंतर एका पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळाल्यास दुसऱ्या पक्षाचा उमेदवार नाराज होऊन बंडखोरी करणार, अशी अटकळ सुरुवातीपासूनच बांधली जात होती. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्याचे टाळले होते. मात्र, काल रात्रीपासून ठाकरे गट आणि मनसेकडून संबंधित उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु झाल्यानंतर ठाकरे गटात पहिली बंडखोरी झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात असलेल्या वरळी कोळीवाड्यातील प्रभागातून हेमांगी वरळीकर यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी नाराज होऊन राजीनामा दिला. हेमांगी वरळीकर यांचे पती हरिष वरळीकर आणि आशिष चेंबुरकर यांच्यावर आरोप करत सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला. वरळीतील प्रभागांमध्ये अजून कुणालाही एबी फॉर्म दिले जात नसल्याने कार्यकर्ते आणि उमेदवारांमधील संभ्रम वाढला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 192 मधून उमेदवारी न मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश पाटणकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
BJP Mumbai Election 2026: मुंबईत उमेदवारी यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरी
ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांप्रमाणे मुंबईत भाजपमध्येही बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील बंडखोरीच्या तयारीत आहेत. सुरेखा पाटील यांनी आपल्या वॉर्डातील मतदारांना एक भावनिक पत्र लिहले आहे. वॉर्ड क्रमांक 27 मधून लढण्यासाठी सुरेखा पाटील या इच्छूक होत्या. मात्र, भाजपने याठिकाणी निलम गुरव यांना उमेदवारी दिली आहे.
Eknath Shinde Shivsena: मुंबईत शिंदे गटात पहिली बंडखोरी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटात पहिली बंडखोरी झाली आहे. मुंबई उपनगरातील दिंडोशी येथील वॉर्ड क्रमांक 37 मध्ये ही बंडखोरी झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी अॅड सिद्धी शेलार यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
आणखी वाचा























